आजरा (हसन तकीलदार): आजऱ्याची नवीन पाणी योजना दोन वर्षानंतरही अपूर्णच आहे. गेली दोन ते तीन वर्षे आजरा शहर व उपनगरात पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, त्याचप्रमाणे आजऱ्यात सगळीकडे रस्ते खोदल्यामुळे आजरा शहराचे झालेले धुळेनगर आणि ठेकेदाराचे नियोजनशून्य तसेच दर्जाहीन कामाचा जाब विचारण्यासाठी आजरा अन्याय निवारण समितीच्या वतीने नगरपंचायतीवर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. छत्रपती संभाजी चौक येथून या मोर्चाला प्रारंभ झाला.
गेली दोन ते तीन वर्षे आजरा शहरामध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पाणी येत आहे. त्यामुळे यावर्षीची पाणीपट्टी माफ करावी, दररोज पाणी पुरवठा करण्यात यावा, ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आणि नियोजनशून्य कारभारामुळे नवीन पाणी पुरवठा योजना रेंगाळलेली आहे. त्याची पूर्तता लवकरात लवकर करावी, धुळीने माखलेले रस्ते पावसाळ्याआधी करावीत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी बोलताना मुकुंददादा देसाई म्हणाले, अन्याय निवारण समितीने मागील दोन वर्षापासून जनतेच्या मूलभूत सोयीसाठी दिलेला लढा हा खरोखरोच स्तुत्य आहे. नगरपंचायतीचा चाललेला कारभार हा नियोजनशून्य आहे. अनेक भागामध्ये पंधरा-पंधरा दिवस पाणी मिळत नाही त्यामुळे महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
यावेळी बोलताना कॉ. संपत देसाई म्हणाले, पायाभूत गरजांसाठी हा मोर्चा काढावा लागतोय म्हणजे ही बाब अतिशय खेदजनक आहे. स्वर्गीय नामदार बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेली 2 कोटी 70 लाखाची जुनी पाईप लाईन योजनेमुळे संपूर्ण आजऱ्याला व्यवस्थित पाणी पुरवठा होत होता. त्यावेळच्या आजऱ्यात आणि आजच्या आजऱ्यात जादा फरक नाही थोडीफार नागरी वस्ती वाढली आहे. त्या योजनेने संपूर्ण आजऱ्याची गरज भागवली मग आता 27 कोटी खर्चून आजरा तहानलेला का? इतके पैसे घालून जर पाणी मिळत नसेल तर मग हे पैसे गेले कुठे? असा सवाल त्यांनी केला.
नाथा देसाई म्हणाले, ठेकेदाराला पाठीशी घालतंय कोण? याचा विचार करणे गरजेचे आहे. या ठेकेदाराने दीड महिन्याची मुदत मागितली आहे त्या दीड महिन्यात जर हे काम पूर्ण नाही झाले तर पुन्हा याला काळ्या यादीत टाकून याच्यावर कारवाई करत याच्याकडून नगरपंचांयतीने पूर्ण वर्षाचा घरफाळा आणि पाणीपट्टी वसूल करावी.
अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे म्हणाले, कालपासून जे पाणी सोडले जात आहे ते जुन्या पाईप लाईन मधूनच सोडले जात. आहे. अद्याप नवीन पाईप लाईन पूर्ण झालेली नाही. जुन्या पाण्याच्या टाकीचाच अजून वापर सुरु आहे. नवीन एक टाकी सूरु केली आहे परंतु त्याला तीन ते चार ठिकाणी गळती आहे. त्यामुळे कामाच्या दर्ज बाबत शंका आहे. यावेळी दयानंद भोपळे यांनीही नगरपंचायतीच्या एकूण कारभारावर व कामकाजावर सडकून टीका केली.
दीड महिन्यात योजना पूर्ण करण्याचे तसेच पाणी पट्टी माफिचा विषय प्रांताधिकारी यांच्याशी बैठक घेऊन जो निर्णय होईल त्यानुसार कार्यवाही होणार आहे. तोपर्यंत पाणी पट्टी भरू नये. जर सकारात्मक निर्णय झाला तर ज्यांनी पाणी पट्टी भरली आहे त्यांची पुढच्या वर्षात वर्ग केली जाईल असे सांगण्यात आले.
यावेळी सुधीरभाऊ देसाई, सुधीर कुंभार, विजय थोरवत, पांडुरंग सावरतकर, गौरव देशपांडे, वाय. बी. चव्हाण, जावेद पठाण, जोतिबा आजगेकर, बंडोपंत चव्हाण, हेमंत गिलबिले, सुभाष नाईक, तानाजी नाईक, संजयभाऊ सावंत, राजा मोहिते, राजू विभुते आदींसह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



