Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भैय्याजी जोशींच्या वक्तव्याचे संतप्त पडसाद ; आजऱ्यात ठाकरे शिवसेनेने केले 'जोडे मारो आंदोलन'

जोरदार निदर्शने करत वक्तव्याचा केला निषेध 




आजरा : मुंबईत मराठी भाषा शिकण्याची गरज नसल्याचे वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या विरोधात आजरा येथील छत्रपती संभाजी चौकात ठाकरे शिवसेनेने जोडे मारो आंदोलन करत  "त्या "वक्तव्याचा जाहीर निषेध केला. जोरदार निदर्शने करीत संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या. सदर आंदोलन शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.  

      


यावेळी बोलताना शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, भैय्याजी जोशी यांनी मुंबईत प्रत्येकाला मराठी बोलताच आली पाहिजे हे काही आवश्यक नाही. मुंबईत वेगवेगळ्या भागात त्या त्या भाषा असून घाटकोपरमध्ये गुजराती भाषिकांची वस्ती आहे त्यामुळे इथली भाषा गुजराती असायला हरकत नाही असे वादग्रस्त विधान केले आहे, हा मराठी भाषेचा व समस्त मराठी माणसांचा अवमान आहे. मुंबई महाराष्ट्रातच रहावी, मराठ्यांची अस्मिता जिवंत रहाण्यासाठी 106 हुतात्म्यानी बलिदान दिले आहे. सध्या मुंबईला महाराष्ट्रातून तोडायचे षडयंत्र सुरु आहे. प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर, भैय्या जोशी सारखी प्रवृत्ती महाराष्ट्राची आणि इथल्या थोर पुरुषांची छबी मलीन करण्याचे काम करीत आहेत. या प्रवृत्तींना वेळीच रोखलं पाहिजे. 



गडहिंग्लज तालुका प्रमुख दिलीप माने म्हणाले, मराठी माणसावर जेव्हा जेव्हा अन्याय होत असतो त्यावेळी खऱ्या अर्थाने पहिल्यांदा रस्त्यावर उतरतात ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक. भैय्या जोशी यांच्यासारखे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम हे करीत आहेत, अशा प्रवृत्तींचा आम्ही निषेध करतो.



आजरा तालुका प्रमुख युवराज पोवार म्हणाले,  मराठी भाषेबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांना वेळीच गप्प बसवलं नाही तर शिवसेनेच्या वतीने या वाचाळांच्या तोंडाला कुलूप घालण्याचे काम करू.  कोरटकर सारख्या माणसाला हे सरकार अभय देत आहे. येणाऱ्या काळात शिवसेनेचा एक एक सैनिक पेटून उठेल आणि यांचा बाजार उठवल्याशिवाय रहाणार नाही. असा इशारा त्यांनी दिला. 

     


यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, संजय येसादे, दिनेश कांबळे, ओंकार माद्याळकर, हरिश्चंद्र व्हराकटे, बिलाल लतीफ, गुड्डू खेडेकर, भाऊ किल्लेदार महेश पाटील, गडहिंग्लजचे उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, संजय पाटील, मनीष हावळ, दिगंबर पाटील, शैलाप्पा साखरे, प्रकाश रावळ यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.