माजी नगरसेवक चंद्रकांत सावंत यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज नगरपरिषद हद्दीतील महाराष्ट्र शासन मंजुर दुसऱ्या शहर सुधारित विकास आराखड्यातील प्रांत कार्यालय असलेली "आरक्षण क्रमांक 19 दुकान केंद्र "शॉपिंग कॉम्प्लेक्स" ही जागा मुळ मालक नगरपालिकेस हस्तांतरित करण्यात यावे अशी मागणी गडहिंग्लजचे माजी नगरसेवक व भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ई-मेल द्वारे पाठवलेल्या पत्रातून केली आहे.
गडहिंग्लज नगरपरिषद हद्दीतील मंजुर दुसऱ्या शहर सुधारित विकास आराखड्यातील प्रांत कार्यालय असलेली "आरक्षण क्रमांक 19 दुकान केंद्र शॉपिंग कॉम्प्लेक्स ही जागा मुळ मालक नगरपालिकेच्या मालकीची आहे. ही शहरातील अत्यंत मोक्याची जागा 1967 मध्ये पहिला प्रारुप विकास आराखडा,1983 मध्ये अंतिम मंजुर पहिल्या विकास आराखड्यात आरक्षण क्रमांक 14 दुकान केंद्र व तदनंतर 2012 व अंतिम शासन मंजूर 2015दुसऱ्या विकास आराखड्यात आरक्षण क्रमांक 19 नुसार दुकान केंद्र म्हणून दर्शविलेली आहे. तत्कालीन स्थानिक स्वराज्य संस्थेने उदात्त हेतूने प्रांत कार्यालयास भाड्याने दिलेली जागा नगरपालिकेला विकसित करावयाची आहे, त्यामुळे गडहिंग्लज सारख्या अत्यल्प आर्थिक उत्पन्न असलेल्या "क" वर्ग नगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचा तो मोठा स्रोत रहाणार आहे.
वारंवार प्रयत्न करूनही नगरपालिकेला जागा मिळवणेस यश आलेले नसुन जनतेप्रती उत्तरदायित्व असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवर चालणाऱ्या महायुतीच्या गतीमान महाराष्ट्र शासनाने प्रांताधिकारी कार्यालयास तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी जनावरांच्या शासकीय दवाखान्याच्या मोकळ्या जागेत मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभी करावी. गडहिंग्लज विभागाचे प्रांताधिकारी कार्यालय असलेली एसटी स्टँड समोरील मुळ मालक असलेल्या नगरपालिकेची जागा गडहिंग्लज नगरपालिकेला परत देण्यासाठी आदेश निर्गमित व्हावेत अशी मागणी त्यांनी या निवेदनातून केली आहे.


