आजरा तहसील कार्यालयातील बैठकीत निर्णय
आजरा(हसन तकीलदार ) : खेडगे ते किटवडे व्हाया आंबाडे रस्त्याचे काम शेतकऱ्यांना विश्वासात न घेता चालू होते. शेतकऱ्यांनी याबाबत कॉ. संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दि. 11 एप्रिल रोजी आजरा तहसीलदार यांना निवेदन देऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाल्याखेरीज रस्त्याचे काम करु देणार नाही असे सूचित केले होते. त्यानुसार शनिवारी १२ रोजी अंबाडे व लिंगवडी येथील शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम बंद पाडले होते. या पार्श्वभूमीवर आज आजरा तहसील कार्यलयात बैठक झाली.
खेडगे ते किटवडे मार्गे आंबाडे रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत होत असल्याने याला संपादन नाही. त्यामुळं कांही शेतकऱ्यांचे खूपच नुकसान होणार आहे. त्याऐवजी रस्त्याची रुंदी कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. या रस्त्यामुळे पावसाळ्यातील पाट पाण्याचे मार्ग बंद होणार आहेत त्याचा सर्व्हे करून पाट पाण्याचे मार्ग पूर्ववत चालू राहतील असे करून देणे. शेतकऱ्यांच्या पाईपलाईन ज्या उखडल्या जातील त्या पूर्ववत बसवून देणे याबाबत शनिवारी १९ रोजी सकाळी 11 वाजता प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन स्थळ पाहणी करूनच निर्णय घेणेत यावा असे ठरले. अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित राहून कोणाचे किती नुकसान होणार हे पाहून कमीत कमी नुकसान अनुमान काढून काम करावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी उपअभियंता अविनाश वायचळ, शाखा अभियंता प्रशांत पाडकर याच्यासह श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई, प्रकाश मोरुस्कर, विष्णू पाटील, सहदेव प्रभू यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


