हलकर्णीतील शेतकऱ्यांचे जनावरांसह बेमुदत उपोषण सुरू
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी येथे सुरू असलेले खडी क्रशर बंद करावेत या मागणीसाठी येथील शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसह आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. क्रशर बंद कृती समितीचे अध्यक्ष राजगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
हलकर्णी व चंदनकुड गावच्या हद्दीत असणाऱ्या एकूण सात खडी क्रशरमुळे या परिसरातील हजारो एकर शेती उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या ठिकाणी असणाऱ्या मानवी वस्तीवर देखील याचे दुष्परिणाम होत असून ब्लास्टिंगमुळे घरांच्या भिंतीना देखील तडे पडले असून काही जणांच्या भिंती देखील कोसळल्या आहेत. क्रशरमुळे निघणाऱ्या धुळीच्या साम्राज्याने या ठिकाणी राहणाऱ्या शेतकऱ्यांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. चाऱ्यावर धुळ साचल्याने जनावरे देखील चारा खाणे टाळत आहेत. या धुळीच्या कणांमुळे जनावरे देखील दगावण्याच्या घटना घडल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. पाण्याचे विविध स्त्रोत देखील खालावले आहेत. या सर्व त्रासाला कंटाळलेले येथील शेतकरी व रहिवाशी सर्व खडी क्रशर बंद व्हावेत यासाठी गेले दहा-बारा वर्ष संघर्ष करीत आहेत.
नुकतेच काही दिवसापूर्वी येथील शेतकऱ्यांनी हलकर्णी येथील ग्रामपंचायत व मंडल अधिकारी कार्यालय आवारात जनावरांसह ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी या ठिकाणी भेट देत प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली होती. येथील शेतकऱ्यांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले होते. त्यानंतर तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी पुढील आदेशापर्यंत क्रशर बंद ठेवण्याचे लेखी आदेश दिल्यानंतर हे आंदोलन शेतकऱ्यांनी मागे घेतले होते. त्यानंतर तहसीलदार कार्यालयात क्रशर मालक व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्थळ पाहणी अहवालानंतरच पुढील निर्णय घेण्याचे ठरले होते. त्यामुळे या बैठकीत देखील ठोस असा तोडगा निघालेला नव्हता. दरम्यान, क्रशर बंद कृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाकडे निवेदन देत पुन्हा लक्ष वेधत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र याबाबत कोणती कारवाई झाली याची माहिती शेतकऱ्यांना मिळालेली नव्हती. त्यामुळे 17 एप्रिल पासून हलकर्णी येथे बेमुदत उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. पार्श्वभूमीवर आजपासून हे उपोषण सुरू झाले आहे.


