Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णीतील खडी क्रशरची सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त पाहणी नाहीच

केवळ 'प्रदूषण' चे दोनच क्षेत्राधिकारी उपस्थित ; अधिकाऱ्यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप 


प्रशासनाला दोन दिवसांचा 'अल्टिमेटम' ; यापुढील आंदोलन वेगळे असणार - क्रशर बंद कृती समिती 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी येथील खडी क्रशर प्रश्नी विविध विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त स्थळ पाहणी करण्याचे बैठकीत ठरले असताना देखील केवळ कोल्हापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दोनच क्षेत्र अधिकारी हलकर्णी येथे उपस्थित राहिल्याने आंदोलक शेतकरी पुन्हा आक्रमक झाले. या अधिकाऱ्यांना धारेवर धरत बैठकीत दिलेला शब्द वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाळला नसल्याने त्यांचा निषेध करत ही संयुक्त पाहणी नसून तर ही नियमित पाहणी आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात सर्व सक्षम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त पाहणी न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा क्रशर बंद कृती समितीचे अध्यक्ष राजगोंडा पाटील यांनी दिला. 



हलकर्णी येथे सुरू असलेल्या सात खडी क्रशरविरोधात येथील शेतकऱ्यांनी आपल्या सर्व जनावरांसह १७ एप्रिल पासून मुख्य चौकात बेमुदत उपोषण सुरू केले होते. दरम्यान, आंदोलनाच्या सातव्या दिवशी आंदोलकांनी रास्ता रोको करून चक्काजाम आंदोलन करण्याचा पवित्रा घेतल्याने प्रशासनाने याचा धसका घेतला होता. अखेर पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने या प्रश्नावर गडहिंग्लज येथे तहसीलदार कार्यालयात प्रांताधिकारी, तहसीलदार, खनिकर्म अधिकारी, भूजलतज्ञ, कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत दिनांक २४ एप्रिल रोजी संयुक्त बैठक घेण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे. एम. हजारे यांनी लेखी पत्र दिले होते. त्यानंतर आंदोलकांनी चक्काजाम स्थगित करून बेमुदत उपोषण कायम ठेवले होते. या अनुषंगाने  गडहिंग्लज येथे झालेल्या बैठकीत दिनांक ३० एप्रिल रोजी क्रशर परिसराची सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्थळ पाहणीचा निर्णय झाल्यानंतर सदर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आज स्थळ पाहणी करण्यात येणार असल्याने सकाळपासूनच सर्व शेतकरी रणरणत्या उन्हात या क्रशर परिसरात थांबून होते. मात्र कोल्हापूरहून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी एस. बी. शिंदे व अंकुश पाटील हे दोन अधिकारी दुपारी साडे बारा वाजता हलकर्णी येथे दाखल झाले.



येथील ग्रामपंचायत व मंडल अधिकारी कार्यालय परिसरात हे  अधिकारी दाखल झाल्यानंतर क्रशर विरोधी कृती समितीचे अध्यक्ष राजगोंडा पाटील यांनी प्रादेशिक अधिकारी का उपस्थित नाहीत? असा सवाल केल्यानंतर आम्हाला पाहणी सुरू करा असे सांगण्यात आल्याचे सांगून ते अधिकारी निरुत्तर झाले. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी ग्रामपंचायत कार्यालय आवारात पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला. क्रशर  बाधित शेतकऱ्यांनी या दोन अधिकाऱ्यांसमोर आक्रमकपणे आपल्या व्यथा मांडत संताप व्यक्त करत सक्षम अधिकारी नसताना आम्ही स्थळ पहाणी करू देणार नाही असा पवित्रा घेतला. केवळ प्रदूषण च्या दोनच क्षेत्र अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतील ही संयुक्त स्थळ पाहणी म्हणणार असाल तर आम्हाला मान्य नाही. नेहमीत पाहणी म्हणत असाल तर आम्ही येऊ यावर आंदोलक शेतकरी अडून राहिले. हे अधिकाऱ्यांनी मान्य केल्यानंतर दुपारी एकच्या दरम्यान क्रशर परिसराची या अधिकाऱ्यांनी पाहणी करण्यास सुरुवात केली. या पाहणी वेळी येथील बाधित शेतकरी कुटुंबातील महिलांनी आपल्या व्यथा या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. तब्बल पाच तास सर्व क्रशरची पाहणी या अधिकाऱ्यांनी करत नोंदी घेतल्या. सक्षम अधिकारीच नसल्याने क्रशरविरोधी कृती समितीचे अध्यक्ष राजगोंडा पाटील यांनी या पाहणीत सहभाग घेतला नाही.



'प्रदूषण' चे प्रादेशिक अधिकारी हजारे यांची बदली; शेतकरी संतप्त 


कोल्हापूर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे. एम. हजारे यांची काल बदली झाल्याची माहिती उपस्थित क्षेत्र अधिकाऱ्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना दिल्यानंतर शेतकरी पुन्हा संतप्त झाले. क्रशर मालकांकडून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू असून आज स्थळ पाहणी असताना काल अधिकाऱ्यांची बदली होते याचे गौडबंगाल काय? असा सवाल क्रशर विरोधी कृती समितीचे अध्यक्ष राजगोंडा पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केला. शासन शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळत आहे असा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.