आजरा (हसन तकीलदार) : आजरा नगरपंचायतीतील सब ठेकेदारांना देण्यात येणाऱ्या कामांमुळे कामे रखडलेली आहेत. अनुभव शून्य लोकांना ठेका दिल्यामुळे कामाचा दर्जा खालवलेला आहे. दर्जाहीन आणि नियोजनशून्य कामामुळे जनतेचे हाल सुरू आहेत असे मत आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांनी मांडले.
यावेळी बोलताना श्री. बामणे म्हणाले, काही नेते मंडळी आपल्या राजकीय फायद्यासाठी नगरपंचायत अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आपल्या मर्जीतील व्यक्तींना जे या क्षेत्रातील अनुभवही नसणार्याना सब ठेकेदार म्हणून महत्वाची सार्वजनिक कामे देत आहेत. अशा प्रकारे पात्रता व अनुभवाचा विचार न करता केवळ राजकीय लाड पुरवण्यासाठी आणि आपली कार्यकर्ते सांभाळण्यासाठी ही ठेक्याची कामे देण्यात येत असल्यामुळे ती कामे वेळेत पूर्ण होत नाहीत, दर्जाही घसरतो, आणि याचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसतो आहे. हे सर्व काही टक्केवारीसाठी की केवळ मतांसाठी सुरु आहे का? असा प्रश्न आजरा शहरातील सामान्य नागरिक विचारू लागले आहेत. लोकांचे मूलभूत प्रश्न,रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, दिवाबत्ती या सर्व सुविधा यामुळे अर्धवट राहतात किंवा उशिरा मिळतात. असे श्री. बामणे यांनी म्हटले आहे.
यासाठी नगरपंचायतीने ठेके देताना नगरपंचायतीत कामे देताना पारदर्शक प्रक्रिया राबवण्यात यावी, कामासाठी पात्रता, अनुभव आणि गुणवत्ता हेच निकष असावेत, अपात्र ठेकेदार व कामगारांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, नगरपंचायतीची कार्यपद्धती जनतेसमोर पारदर्शक करण्यात यावी, काळ्या यादीतील ठेकेदारांना काम देऊ नये, शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आदी बाबींकडे श्री. बामणे यांनी लक्ष वेधले आहे. अन्यथा जनतेच्या हक्कासाठी आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

