गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील राजेंद्र शंकर कोकीतकर यांनी दिलेल्या परवानगीपेक्षा अनाधिकृत बांधकाम केले असून ते बांधकाम काढण्यात यावे या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन महाराष्ट्र राज्य संघटनेचे कोल्हापूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष अविनाश ताशिलदार यांनी गडहिंग्लज नगरपरिषद समोर एकदिवशीय उपोषणास बसले आहेत. याबाबत श्री. ताशिलदार व सचिव अशोक बार्देस्कर यांनी दिनांक ७ जून रोजी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत याकडे लक्ष वेधले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, आजरा रोड येथील सिद्धिविनायक अपार्टमेंट येथे सि.स.नं. १०३/१ अ.ब. मध्ये श्री. कोकितकर यांनी दिलेल्या बांधकाम परवानगीपेक्षा अनाधिकृत बांधकाम केल्याचे सिध्द झालेले आहे. मात्र त्यांच्यावर आजअखेर कारवाई झालेली नाही. नगरपरिषद प्रशासन चौकशी करून अहवाल देण्यास टाळाटाळ केलेली आहे, असा आरोप या निवेदनात केला आहे.
श्री. कोकीतकर यांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ अन्वये रितसर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ते लाक्षणिक उपोषण करत आहेत. या आंदोलनात जनता दलाचे सागर पाटील यांनी देखील सहभाग दर्शवून पाठिंबा दिला आहे.

