Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हळहळणारे भरपूर, परंतु मायेची फुंकर घालणारे कोणीच नाहीत

आरदाळच्या वयोवृद्ध गंगाराम कांबळे यांना घर देता का घर? म्हणण्याची वेळ 


प्रशासनाचे दुर्लक्ष, काही बरे वाईट झाल्यास प्रशासन जबाबदार -कॉ. शिवाजी गुरव




आजरा (हसन तकीलदार ) : आजरा तालुक्यातील आरदाळ येथील 80 वर्षाचे वृद्ध गंगाराम कांबळे यांना घर देता का घर? अशी म्हणायची वेळ आली आहे. कोणतेही जवळचे नातेवाईक नसल्यामुळे ते एका पडक्या घरात रहात आहेत. काही सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी प्रयत्न करीत आहेत परंतु त्यांना मर्यादा येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष घालून या वृद्धाची मदत करावी असे आवाहन कॉ. शिवाजी गुरव यांनी केले आहे.

      


आरदाळ येथील 80 वर्षीय वृद्ध गंगाराम कांबळे सध्या पडक्या आणि धोकादायक घरात रहात आहेत. यावर्षी पावसाचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे चालू पावसाळ्यात त्यांच्या घराची पडझड झाली आहे. ग्रामसेवक पाहणी करून गेलेत मात्र प्रशासनाने त्यांची कोणतीच व्यवस्था केलेली नाही. राहते घर पडण्याच्या अवस्थेत आहे. आरदाळ गावचे सामाजिक कार्यकर्ते व ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते डॉ. महादेव ढोकर -पाटील, सुहास पाटील, बयाजी ससाणे यांच्यासह काही कार्यकर्ते त्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करीत आहेत परंतु त्यांना काही मर्यादा येत आहेत.

      

गंगाराम कांबळे यांचे घर कोणत्याही क्षणी पडण्याच्या स्थितीत आहे. त्यांचे जवळचे नातेवाईक कोणीही नाहीत. त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याने घरी ते एकटेच राहतात. वयोमानानुसार आता त्यांना पूर्वीसारखी मजुरीची कामे होत नाहीत. गळक्या, ओल्या घरात ते एकटेच रहात आहेत. छप्पर पडण्याच्या स्थितीत आहे.


गंगाराम कांबळे यांना सध्या आसऱ्याची गरज आहे. वादळी पाऊस जोरात सुरु आहे. वादळ वाऱ्यामुळे त्यांचे घर केंव्हाही पडू शकते. किमान प्रशासनाने तरी यामध्ये लक्ष घालून त्यांच्या राहण्याची तजवीज करणे क्रमप्राप्त ठरते परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. घर कोसळून त्यांचे काही बरे वाईट झालेस प्रशासन जबाबदार राहील असे कॉ. शिवाजी गुरव यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.