भाजप अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी पत्रातून वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील खेड्यांची मुळ महसुली गाव वसाहत हा केंद्रबिंदू मानून 31 डिसेंबर 2024 पर्यंतच्या सर्व वाढीव वस्त्यांची गावठाण वाढ होऊन यामधील मिळकतींचे सिटी सर्व्हे नकाशे व प्राॅपर्टी कार्डस मिळावेत अशी मागणी भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेल द्वारे पाठवलेल्या पत्रातून केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी होऊन 64 वर्षें झाली.त्यानंतर केवळ हाताच्या बोटावर मोजता येणारा अपवाद वगळता महसुली गावांची उद्घोषणा अधिसुचना होऊन नवीन गावे अस्तित्वात आलेली नाहीत. मुळ गावाच्या गावठाणाच्या चारी अंगाला वाड्या-वस्त्यांवर शेतात घरे बांधून गोरगरीब लोक कसेबसे नागरी सुविधांपासून वंचित जीवन जगत आहेत. ना त्यांना चांगले रस्ते आहेत ना पिण्याच्या पाण्याची आणि विजेची सोय. दिवाबत्ती नाही. सांडपाण्यासाठी गटारे नाहीत . शासनाचे कोणतेही विकासकामं झालेले नाही.आरोग्याच्या समस्या तर प्रचंड प्रमाणात भेडसावत आहेत. त्यांच्या रहात्या मिळकती ह्या बिनशेती नसल्याने त्यांना त्यावर कोणत्याही राष्ट्रीय बॅंकेचे कर्ज मिळत नाही. प्राॅपर्टी कार्ड किंवा 7/12 उतारा स्वतंत्र नसल्याने त्यांचे खरेदी विक्री व्यवहार होत नाहीत.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळात त्यांनाही आदर्श नागरी जीवन जगायचा मुलभुत अधिकार आहे. तेंव्हा 31 डिसेंबर 2024 ही नियत दिनांक गृहित धरून तिथपर्यंतच्या कोणत्याही लगतच्या गावठाणापासून 1000 मीटर पर्यंतच्या परिघावरील वसाहतींचा सिटी सर्व्हे होऊन अशा वसाहती सदर गावांची गावठाण वाढ म्हणून अधिसुचित कराव्यात. अशा वाढीव वसाहतीची लोकसंख्या 1000 पेक्षा जास्त असेल तर ते नवीन महसुली गाव म्हणूनच त्याला वैधानिक दर्जा द्यावा. त्यांना भारत सरकारच्या स्वामित्व हक्क योजनेखाली सरकारी सॅटेलाईट सर्व्हे होऊन सिटी सर्व्हे नकाशे व प्राॅपर्टी कार्डस प्रदान करावेत अशी मागणी श्री. सावंत यांनी या पत्रातून केली आहे.


