आमदार सोनवणे यांच्या बेताल वक्तव्याचा गडहिंग्लजला मोर्चा काढत बेरड समाजाकडून निषेध
त्यांच्यावर योग्य ती कारवाई न झाल्यास राज्यात फिरू न देण्याचा दिला इशारा
आंदोलनाला ठाकरे शिवसेना व मनसेचा पाठिंबा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी बेरड रामोशी समाजाबाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा गडहिंग्लज येथे समाज बांधवांनी मोर्चा काढून निषेध केला. आमदार सोनवणे यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा त्यांना राज्यात फिरू न देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. बेरड समाजाचे नेते बाळेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला प्रारंभ झाला. जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालय आवारात आला. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर बाळेश नाईक म्हणाले, आमदार शरद सोनवणे यांनी नगरवरून रामोशी समाज येतो आणि दिवसाढवळ्या दरोडा टाकून जातो, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे असे बेताल वक्तव्य करत समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. आमदार सोनवणे यांच्या मतदारसंघात रामोशी, बेरड समाजाची संख्या उल्लेखनीय आहे.आमदार सोनवणे विधानसभेला अपक्ष म्हणून विजय होण्यामागे रामोशी-बेरड समाजाचे योगदान मोठे आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नरवीर उमाजी नाईक यांनी दिलेले बलिदान फार मोठे आहे. अशा थोर वंशजांबाबत बेताल वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही. आमदार सोनवणे यांच्यावर मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी योग्य ती कारवाई न केल्यास आम्ही प्रसंगी कायदा हातात घेऊ असा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चात शिवानंद घस्ती, श्रीशैल पाटील, गणपतराव पट्टणकुडी, दयानंद पट्टणकुडी, प्रशांत नाईक, प्रशांत पाटील, विजय पट्टणकुडी, अशोक गडदराम, विक्रांत नाईक, भीमराव चिगरी, बसू देशनूरे, बाबू नाईक, रामू नाईक, शहाजी नाईक, निर्मला नाईक, रवी नाईक, श्रीधर नाईक, बाबू घस्ती, मारुती नाईक, कैलास नाईक, विनायक नाईक, सागर गुंडली, लिंगराज पाटील, सुरेश कतीगार, रामा कतीगार, उत्तम नाईक, राजाराम पाटील, नागाप्पा घस्ती, श्रीकांत गुरव, चाळू गुरव, मल्लाप्पा देशनुरे, रमेश पाटील, लाला नाईक, अर्जुन उदगट्टी, तुकाराम घस्ती, रावसाहेब पाटील, बाबुराव पाटील यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, या आंदोलनाला ठाकरे शिवसेनेने व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठींबा दर्शविला. यावेळी ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रकाश रावळ, मनीष हावळ, सागर कुराडे, बाळू कुंभार तर मनसेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले हे आंदोलनात सहभागी झाले.





