Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जिल्हाधिकारी अमोल येडगे थेट शेत शिवारात ; शेतकऱ्यांशी साधला संवाद

गडहिंग्लज तालुक्यातील विविध विकासकामांची पाहणी


भडगाव येथे ई-पीक पाहणी प्रात्यक्षिक मोहिमेत सहभाग




गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी गडहिंग्लज तालुक्यात विविध ठिकाणी भेटी देत विकासकामांसह शेती नुकसान, ई पीक पाहणी आदी बाबींची माहिती घेतली. भडगाव येथे त्यांनी थेट शेत शिवारात जावून प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधला. यामुळे शेतकरी वर्गातूनही समाधान व्यक्त करण्यात आले.




या भेटीवेळी गडहिंग्लज तहसीलदार कार्यालयात महसूल विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर भडगाव येथे ई-पीक पाहणी प्रात्यक्षिक मोहिमेत सहभाग घेतला.  यानंतर भडगाव येथील प्राथमिक केंद्रालाही भेट दिली. त्यानंतर हनिमनाळ येथे ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाचे उदघाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत व जिवंत सात-बारा मोहिमेंतर्गत लाभार्थ्यांना फेरफारचे वाटप करण्यात आले. तसेच येथील पुरातन मारुती मंदिरालाही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली.






गडहिंग्लज शहरातील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची पाहणी 

 

गडहिंग्लज शहरामध्ये सुरू असलेल्या सुधारित नळपाणी योजनेच्या कामाचाही आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. फिल्टरेशन टँकचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष जाऊन या

कामाची माहिती घेतली. सदर ठेकेदाराला मार्चपूर्वी सदरचे काम संपविण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार ऋषीकेत शेळके, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक  यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.


भडगाव येथे ई पीक पाहणी ; अधिकाऱ्यांना सूचना 




दरम्यान, भडगाव येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रत्यक्ष शेतात जावून शेतकऱ्यांशी संवाद साधला. ई पीक पाहणीबाबत त्यांनी माहिती घेतली. अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. ग्राम महसूल अधिकारी सौ. रूपाली कांबळे यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय नाईक, सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक, रवींद्र शेंडुरे, राजू खमलेहट्टी, सागर गुडसे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत कामकाजाची पाहणी केली.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.