११ तालुक्यातील ६३ गावातील शेतकऱ्यांशी साधणार संवाद
शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे
चंदगड : शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारे शक्तीपीठ आम्हाला नको त्याऐवजी सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. अशी प्रमुख मागणी घेऊन शेतीउद्योग आणि शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या विविध प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यसाठी शिवसेनेतर्फे दिंडीचे आयोजन केले असून तीन दिवसाच्या दिंडी कार्यक्रमातून जिल्हातील ११ तालुक्यातील ६३ गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. या दिंडी कार्यक्रमात जिल्हयातील शेतकऱ्यांनी मोठया संख्येन सहभागी होऊन शासनाला जाब विचारावा असे आवाहन शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) करण्यात आली आहे. शेतकरी दिंडीचा प्रारंभ १० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता चंदगड येथील रवळनाथ मंदिराजवळ होईल.
शेतकरी दिंडीच्या माध्यमातून शिवसेनाचा हा एल्गार शासनाला जाग आणणार आहे. या दिंडीच्या माध्यमातून विविध मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करा, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपये अनुदान द्या, शेतीपंपाला मोफत वीज पुरवाठा करा, खते बियाणे यासाठी ५० टक्के अनुदान द्या, शेतकऱ्यांची पाणीपट्टी रद्द करा, शेतकरी शेतमजूरांना निवृत्तीवेतन सुरू करा, गेल्यावर्षी महापूरात पडझड झालेल्या घरांना नुकसानभरपाई द्या, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
शिवसेना नेते आमदार सुनिल प्रभु यांच्या हस्ते या दिंडीचे उदघाटन होईल. यावेळी संपर्कप्रमुख अरूणभाई दूधवडकर, आमदार सुनिल शिंदे, शिवसेना उपनेते नितिन बानुगडे पाटील, संजय पवार, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, संजय चौगुले, वैभव उगळे, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, रियाज शमनजी, अस्लम शेख, जिल्हा संघटक नवेज मुल्ला, चंगेश खान यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिंडीत सहभाग द्यावा असे आवाहन जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी केले आहे.

