Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयाला क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर अवॉर्ड मिळाल्याबद्दल गडहिंग्लज शहरातून जल्लोषी रॅली



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयाने आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय, राज्य व जिल्हा व तालुका पातळीवर उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिवराज महाविद्यालयास ‘क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर अवॉर्ड २०२५’ ने शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांच्या हस्ते संस्थेचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे व प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, क्रीडाशिक्षक डॉ.राहुल मगदूम, प्रा.जयवंत पाटील व महाविद्यालयातील यशस्वी खेळाडूंना मानाचा चषक व रोख पंधरा हजार देऊन सन्मानीत केल्याबद्दल आज शहरातून वाजत-गाजत जल्लोषी रॅली काढण्यात आली.



या रॅलीचे उदघाटन माजी क्रीडा शिक्षक प्रा.एस.एस.सावंत व गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक विजय घाटगे म्हणाले,  शिवराज महाविद्यालयाने क्रीडा क्षेत्रात मिळविलेला हा सन्मान गडहिंग्लजकरांना भूषणावह आहे. या महाविद्यालयाच्या खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात ऑलिंपिक पदक पटकविणे आवश्यक आहे असे आवाहन केले. पोलीस कॉन्स्टेबल भारती करडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आप्पासो शिवणे,  श्रीरंग उर्फ पापा चौगुले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.



तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी शिवराजच्या खेळाडूंनी मिळविलेला हा पुरस्कार गौरवास्पद आहे. महाविद्यालयाच्या  खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी आणि क्रीडा क्षेत्रात करिअर घडवावे असे सांगून अभिनंदन केले. महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात संस्था सचिव डॉ.अनिलराव कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, क्रीडाशिक्षक डॉ.राहुल मगदूम, प्रा.जयवंत पाटील व खेळाडूंचा व प्रशिक्षक प्रज्योत नाईक गोवा यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.




संस्था सचिव डॉ.अनिलराव कुराडे म्हणाले,  शिवराज महाविद्यालयाच्या खेळाडूंनी क्रीडाशिक्षक डॉ.राहुल मगदूम, प्रा.जयवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाने शिवराज महाविद्यालयाचा क्रीडा क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. गेली २५ वर्ष महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक व खेळाडूंनी घेतलेल्या या अथक प्रयत्नामुळे हे यश प्राप्त झालेले आहे. क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर अवार्डने आमच्या महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्राला अधिक बळ मिळाले आहे. आमच्या महाविद्यालयाचा हा अभिमान क्रीडा क्षेत्राशी ऋणानुबंध जपणारा आहे. असे सांगितले.



संपूर्ण शहरातून वाजत-गाजत काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘शिवराज कॉलेजचा विजय असो’ या घोषणांनी जयघोष केला. शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड. दिग्वीजय कुराडे, संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, संचालक प्रा.विश्वजित कुराडे, रजिस्ट्रार डॉ.संतोष शहापूरकर यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, खेळाडू व  विद्यार्थी-विद्यार्थिनी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.