भौतिकशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. वर्मा यांनी 'जागृती'च्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद
गडहिंग्लज (प्रतिनिधी ): भौतिकशास्त्रातील संकल्पना केवळ पाठांतर न करता प्रत्यक्ष प्रयोग, सूक्ष्म निरीक्षण आणि चिकित्सक विचारसरणीच्या माध्यमातून समजून घेऊन प्रश्न विचारण्याची सवय जोपासली तरच ज्ञानाचा खरा शोध लागतो' असे प्रतिपादन प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. एच. सी.वर्मा यांनी जागृती हायस्कूल, गडहिंग्लज येथे आयोजित विद्यार्थ्यांच्या हितगुज कार्यक्रमात केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतीश घाळी होते.
स्वागत व प्रास्ताविक सौ. रिजवाना मुल्ला यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ. स्मिता सुतार यांनी करून दिला. पुढे बोलताना डॉ. वर्मा म्हणाले, प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान दडलेले असते. त्यामागील तत्वे समजून घेतली तर विज्ञान शिकणे अधिक सोपे आणि आनंददायी होते. विद्यार्थ्यांनी जिज्ञासूवृत्ती विकसित करून प्रत्येक गोष्टीमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करावा. शालेय जीवनात प्रयोगशीलता अंगीकारावी असे आवाहन करून प्रत्यक्ष प्रयोगाचे प्रात्यक्षिक करून विज्ञानातील गुंतागुंतीच्या संकल्पना सहज आणि रंजक पद्धतीने स्पष्ट केल्या. डॉ. सतीश घाळी यांनी अध्यक्षीय मनोगतातून वैज्ञानिक दृष्टिकोन हीच भविष्यातील यशाची गुरुकिल्ली असून संशोधन आणि नवोपक्रमाची कास धरण्याचे सांगितले.
यावेळी संस्थेचे सचिव ॲड. बी. जी. भोसकी, सहसचिव गजेंद्र बंदी, मुख्याध्यापक उमेश सावंत, उपमुख्याध्यापक अनिल मसाळे, पर्यवेक्षक महंतेश दड्डी यासह विज्ञान शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदानंद फुटाणे यांनी तर आभार एस. जे.पाटील यांनी मानले.


