बारा वर्षाखालील स्पर्धा : नवोदितांना मिळणार अधिक सामने
गडहिंग्लज (प्रतिनिधी ): येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएनशनतर्फे शनिवार ११ ते १३ जुलै अखेर ‘एमआर – युनायटेड’ ट्रॉफी शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. साखळी बाद पध्दतीमुळे नवोदितांना अधिक सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. बारा वर्षाखालील गटासाठी ही स्पर्धा आहे. एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे यंदाचे चौथे वर्ष आहे.
बालपणीच अधिक सामने खेळण्याची संधी मिळाल्यास अधिक चांगले खेळाडू घडतात. त्यासाठी बारा, पंधरा, सतरा वर्षाखालील खेळाडूंसाठी अधिक स्पर्धा घ्याव्यात अशी सुचना फिफाने केली आहे. त्या धर्तीवर या विभागातील हजारो खेळाडू घडविणा-या महाराणी राधाबाई हायस्कूलचे (एम. आर.) शतकमहोत्सवी गतवर्षापासून ही स्पर्धा सुरु करण्यात आली. स्पर्धेत शाळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कोळकी, उपाध्यक्ष सतीश पाटील आणि ‘एमआर’चे प्राचार्या सपना माने यांनी केले आहे.
एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर तीन दिवस हि स्पर्धा होईल. साखळी बाद पध्दतीने प्राथमिक फेरी होईल. खेळाडूंची शारिरीक क्षमता लक्षात घेऊन मैदानाचा आकार लहान ठेवण्यात येणार आहे. सन २०१४ किंवा त्यानंतरचा जन्म झालेला विदयार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. विजेत्या आणि उपविजेत्या संघासह सहा वैयक्तीक बक्षिसे आहेत. शनिवारी दुपारी एक वाजता स्पर्धेचे उद्घाटन होईल. रविवारी सायंकाळी उपांत्य फेरीचे तर सोमवारी सायंकाळी अंतिम सामना होणार आहे. स्पर्धा समन्वयक सश्रृत सासने आणि सहकारी स्पर्धेचे नियोजन करीत आहेत.

