Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवरायांची प्रेरणा अन् राष्ट्ररक्षणाचा वसा!’: गडहिंग्लजमध्ये २६ मराठा लाईट इन्फंट्रीचा ३८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): देशरक्षणासाठी शौर्य, शिस्त आणि त्यागाची उज्ज्वल परंपरा जपणार्‍या ‘२६ मराठा लाईट इन्फंट्री’चा ३८ वा वर्धापन दिन गडहिंग्लज येथे आजी-माजी सैनिकांच्या वतीने अत्यंत उत्साही  वातावरणात साजरा करण्यात आला. या वेळी बटालियनने आतापर्यंत देशासाठी बजावलेल्या अतुलनीय कर्तव्यास आणि गौरवशाली इतिहासाला उजाळा देण्यात आला.



कार्यक्रमाचा प्रारंभ मराठा रेजिमेंटचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून झाला. यानंतर देशसेवेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.



कार्यक्रमात बोलताना ऑननरी कॅप्टन निवृत्ती देवरकर यांनी मराठा लाईट इन्फंट्रीच्या प्रदीर्घ आणि गौरवशाली परंपरेचा आढावा घेतला. या युनिटने सैनिकांना नेहमीच उच्च दर्जाची कर्तव्यनिष्ठा, कडक शिस्त आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा दिल्याचे त्यांनी नमूद केले. मुगळी येथील निवृत्त हवालदार बाळगोंडा कटकोळे यांनी बटालियनने गेल्या ३८ वर्षांत राबवलेल्या विविध यशस्वी मोहिमांची माहिती दिली. देशसेवेत बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल या बटालियनला ७० हून अधिक राष्ट्रीय सन्मान व गौरवचिन्हांनी सन्मानित करण्यात आल्याचा सार्थ अभिमान त्यांनी व्यक्त केला.



या वेळी निवृत्त सुभेदार प्रकाश पोटजाळे यांनी आपल्या मनोगतातून सैनिकांमधील बंधुभाव, आपुलकी आणि एकजूट अधिक दृढ करण्याचे आवाहन केले. शौर्य व त्यागाची परंपरा जपणारी २६ मराठा लाईट इन्फंट्री राष्ट्ररक्षणासाठी सदैव तत्पर असल्याचे उपस्थितांनी अभिमानाने सांगितले.



कार्यक्रमाचा समारोप स्फूर्तीदायक ‘मराठा स्फूर्ती गीत’ आणि राष्ट्रगीताने करण्यात आला. या वर्धापन दिनाच्या  निमित्ताने २६ मराठा लाईट इन्फंट्रीच्या सर्व आजी-माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबाला उपस्थितांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.



७० हून अधिक सन्मानांचा गौरवशाली पट!


२६ मराठा लाईट इन्फंट्रीने गेल्या ३८ वर्षांत देशाच्या विविध सीमांवर व बिकट परिस्थितीत अत्यंत यशस्वी मोहिमा फत्ते केल्या आहेत. सैनिकांचे असीम शौर्य, कडक शिस्त आणि प्रामाणिक देशसेवेच्या जोरावर या युनिटला आतापर्यंत ७० हून अधिक पदके व सन्मानचिन्हांनी गौरविले गेले आहे. हा गडहिंग्लजसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण असल्याचे या वेळी निवृत्त सैनिकांनी आवर्जून सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.