Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उंबरवाडीत पर्यावरणपूरक 'वेलकम मेळावा'; बालसंस्कार आणि वृक्षारोपणाचा अनोखा मेळ!

अंगणवाडीत 'नवचेतना व आधारशिला' अंतर्गत वेलकम मेळावा उत्साहात




गडहिंग्लज (प्रतिनिधी ): एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प, गडहिंग्लज अंतर्गत महागाव बीट मधील उंबरवाडी येथील अंगणवाडीत 'नवचेतना व आधारशिला' उपक्रमांतर्गत 'वेलकम मेळावा' अत्यंत उत्साहात पार पडला. बालकांच्या सर्वांगीण विकासासह पालकांमध्ये शिक्षणाविषयी जागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने आयोजित या मेळाव्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रमुख मार्गदर्शन पंचायत समितीच्या सभापती डॉ. प्रतिभा चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह चव्हाण आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी रूपाली भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात अंगणवाडी सेविका प्रमिला घेवडे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी उपक्रमाची पार्श्वभूमी विशद करून उपस्थितांचे स्वागत केले.



पालकांचा सहभाग बालविकासाचा पाया : डॉ. प्रतिभा चव्हाण


आपल्या मार्गदर्शनात सभापती डॉ. प्रतिभा चव्हाण म्हणाल्या, बालकांच्या सर्वांगीण आणि निकोप विकासासाठी माता व पालकांमध्ये पोषण, आरोग्य, स्वच्छता आणि पूर्व-प्राथमिक शिक्षणाबाबत निरंतर जनजागृती होणे काळाची गरज आहे. हा उपक्रम याच ध्येयाने राबवला जात आहे.



जि. प. सदस्य अमरसिंह चव्हाण यांनी बालकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर प्रकाश टाकत पूर्व-प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अंगणवाडीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तर बाल विकास प्रकल्प अधिकारी रूपाली भोसले यांनी 'खेळातून शिक्षण' आणि बालकांच्या घडणीत पालकांचा सक्रिय सहभाग कसा महत्त्वाचा आहे, यावर सविस्तर मार्गदर्शन केले.



वृक्षभेट ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू


या मेळाव्यात लोकसहभागाचे अनोखे रूप पाहायला मिळाले. ग्रामपंचायत सदस्य रामजी घेवडे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना झाडे भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण चिमणे व क्रांती ग्रामसंघाच्या अध्यक्षा रूपाली सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.



या प्रसंगी सरपंच कविता सुतार, ग्रामपंचायत अधिकारी तुषार काळे, सदस्या वर्षा चिमणे, तेजस्विनी कोकितकर यांच्यासह परिसरातील नागरिक, महिला व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सुवर्णा पोवार यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.