पंधरावे वर्ष, तीन दिवस चालणार सामने
गडहिंग्लज (प्रतिनिधी ): येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे शनिवारपासून (ता.१५) रुद्राप्पा हत्ती, आप्पासाहेब कोले, शण्मुगम स्मृतीचषक शालेय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. चौदा आणि सोळा वर्षाखालील गटाच्या या स्पर्धेचे यंदाचे पंधरावे वर्ष आहे. एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर नाईन साईट पध्दतीने ही स्पर्धा तीन दिवस होणार आहे.
अजित क्रीडा मंडळाचे अध्यक्ष रूद्राप्पा हत्ती आणि सहकाऱ्यांनी दिवाळी सुट्टीत दोन दशके आंतरराज्य स्पर्धांची पंरपंरा रुजवली. एम. आर. हायस्कुलचे माजी क्रीडा शिक्षक आप्पासाहेब कोले यांनी अनेक फुटबॉल खेळाडू तयार करून गडहिंग्लजच्या फुटबॉलचा नावलौकीक वाढविला. पुण्याचे पंच शण्मुगम यांनी अजित क्रीडा मंडळाच्या स्पर्धा यशस्वी करणेसाठी तांत्रिक जवाबदारी घेत अथक परिश्रम घेतले. या सर्वांच्या योगदानाची नव्या पिढीच्या फुटबॉलपटूंना ओळख व्हावी या उद्देशाने ही स्पर्धा घेतली जाते. पुढील महिन्यात होणाऱ्या शासकीय स्पर्धेच्या तयारीसाठी ही स्पर्धा आहे.
स्थानिकसह ग्रामीण भागातील गिजवणे, गारगोटी या संघाना निंमत्रित करण्यात आले आहे. विजेत्या, उपविजेत्या संघासह उत्कष्ठ गोलरक्षक, बचावपटू, मध्यरक्षक, आघाडीपटू, स्पर्धावीर यांना बक्षिसे आहेत. शनिवारी सकाळी अकरा वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल. रविवारी सायंकाळी उपांत्य फेरी तर सोमवारी सायंकाळी अंतिम सामना होणार आहे. तरी संघानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गडहिंग्लज युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी, उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी केले आहे. समन्वयक महेश पोवार, किरण लोखंडे आणि सहकारी स्पर्धेचे नियोजन करीत आहेत.

