कोवाडेजवळ चिखलातून कसरत करत ग्रामस्थ, वाहनांची ये-जा, तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोवाडे-गडहिंग्लज रस्त्यावर कोवाडे बस स्टँडजवळ पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे आणि त्यात साचलेल्या पाण्यामुळे रस्त्याला चिखलाचे स्वरूप आले आहे. या दुरवस्थेमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून ग्रामस्थांना दैनंदिन ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पावसाळा संपेपर्यंत किमान मुरूम टाकून खड्डे बुजवावेत आणि पावसाळ्यानंतर डांबरीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थ व वाहनधारकांमधून होत आहे.
कोवाडे आणि निंगुडगे दरम्यान कोवाडे स्टँडपासून काही अंतरापर्यंत रस्त्याची अत्यंत वाईट स्थिती झाली आहे. खड्ड्यांमध्ये गाड्या अडकून पडल्याने वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि वेळेचा अपव्यय थांबवण्यासाठी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त होत आहे.
महत्त्वाचा संपर्क मार्ग खडतर
हा रस्ता केवळ कोवाडेकरांसाठीच नव्हे, तर हाजगोळी, पेद्रेवाडी, सरोळी, ऐनापूर आणि आजरा या प्रमुख ठिकाणांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. दररोज या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. रस्ता चिखलमय झाल्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून वाहनचालकांना कसरत करत गाड्या चालवाव्या लागत आहेत.
पावसाळा संपेपर्यंत खड्ड्यांमध्ये त्वरित मुरूम भरून रस्ता वाहतुकीयोग्य करावा. पावसाळा संपल्यानंतर संपूर्ण रस्त्याचे योग्य दर्जाचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे.



