प्रात्यक्षिकातून विद्युत सुरक्षा धडे; १८२ विद्यार्थ्यांचा सहभाग
गडहिंग्लज (संपत सावंत ): विद्युत निरीक्षक कार्यालय, कोल्हापूर व गडहिंग्लज विभागीय महावितरण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागृती हायस्कूल, गडहिंग्लज येथे विद्युत सुरक्षा एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे महत्त्व पटवून देतानाच विविध विद्युत उपकरणे हाताळताना घ्यावयाच्या खबरदारीचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय पवार, सहा. अभियंता अमोल गिरमे,प्रधान यंत्रचालक लक्ष्मण सुतार यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक अनिल मसाळे होते.
स्वागत व प्रास्ताविक अनिल कांबळे यांनी केले. कुमारी श्रुतिका पाटील हिने 'विद्युत सुरक्षा प्रतिज्ञा' सामुदायिकरित्या दिली. दरम्यान आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी सौ. वंदना राणे यांच्या कडून आर्थिक मदत देण्यात आली... संस्था अंतर्गत बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्र,मेडल्स, आकर्षक ट्रॉफी व पुस्तक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यशाळेत बोलताना संजय पवार म्हणाले," वीज आपल्या घरांना प्रकाशमान करते. उद्योग, शेती आणि दैनंदिन जीवनाला गतिमान बनवते. मात्र क्षणभराचा निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. सावधगिरी हीच सुरक्षिततेची पहिली पायरी आहे. पावसाळ्यात विद्युत उपकरणापासून अपघातांचा धोका वाढत असल्याने ओल्या हाताने विद्युत उपकरणे हाताळू नयेत, असुरक्षित तारा वापरू नयेत, सदोष वायरिंग तातडीने दुरुस्त करावे असे सांगितले. सहा.अभियंता अमोल गिरमे यांनी सौर ऊर्जा काळाची गरज या विषयावर बोलताना म्हणाले, सौर ऊर्जा ही सुरक्षित,शाश्वत आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी महत्त्वाची असून ती उद्याच्या सुरक्षित भविष्याची नांदी असल्याचे सांगितले. प्रधान यंत्रचालक लक्ष्मण सुतार यांनी विविध सुरक्षा साधनांची माहिती देत त्यांचा योग्य वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यशाळेत १८२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना 'टेस्टर' बक्षीस देऊन प्रोत्साहित करण्यात आले. अध्यक्षीय मनोगतातून अनिल मसाळे यांनी विद्युत सुरक्षिततेचे महत्त्व विषद करत या कार्यशाळेतून मिळालेली माहिती आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणावी असे आवाहन केले.
यावेळी मुख्याध्यापक उमेश सावंत, पर्यवेक्षक महंतेश दड्डी, सौ. वंदना राणे, चंद्रकांत कोरवी, प्रवीण पाटील, दत्ता लोहार,सौ. स्मिता शिंदे, सौ. एस.पी. कोलते,सौ. राजश्री जंगली यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपत सावंत यांनी तर आभार सदानंद फुटाणे यांनी मांनले.



