गडहिंग्लज (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीला चालना देण्यासाठी तेरणी (ता. गडहिंग्लज) येथील कै. अशोक रावसाहेब देसाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विशेष उपक्रम राबवण्यात आला. शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त पुढाकारातून इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, बॅग, कंपास बॉक्स, वह्या व आवश्यक शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
अभ्यासासोबत शिस्त व संस्कार जपा: मुख्याध्यापिका हालबागोळ
आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबता कामा नये. शिक्षकवृंदाने एकत्र येत राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी या साहित्याचा योग्य वापर करून मन लावून अभ्यास करावा. भविष्यात यशस्वी होताना अभ्यासासोबतच शिस्त, स्वच्छता आणि संस्कार यांना प्रथम प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्याध्यापिका सौ. एस. एन. हालबागोळ यांनी केले.
शिक्षण हेच यशाचे खरे साधन: सल्लागार समिती
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असे सामाजिक व शैक्षणिक उपक्रम अत्यंत गरजेचे आहेत. शिक्षण हेच यशाचे खरे साधन असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना अधिक कष्ट उपसून शिकण्याची प्रेरणा मिळते असे शालेय सल्लागार समितीचे सदस्य सुरेश लांडे, संजय जोशी, मलाप्पा इंगवले यांनी सांगितले.
या कार्यक्रमास जेष्ठ शिक्षक बी. एस. गळाठी, ए. आय. नरेवाडी, एस. आय. कांबळे, सौ. डी. एस. बंदी, सौ. व्ही. एस. सुतार, श्री यू. नदाफ, सौ. एस. व्ही. भोगाणे यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी जे. टी. नाईक उपस्थित होते.
शिक्षकांच्या उपक्रमाचे पालक वर्गातून कौतुक
शाळेतील शिक्षकांनी स्वतःच्या योगदानातून गरजू विद्यार्थ्यांसाठी उभा केलेला हा स्तुत्य उपक्रम पाहून उपस्थित पालक, ग्रामस्थ व मान्यवरांनी शिक्षकवृंदाचे मनःपूर्वक कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा शैक्षणिक उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

