Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुंबईच्या दळणवळणाला गतिमानतेचा 'बुस्टर' मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईकरांच्या सेवेत २०२७ मध्ये मेट्रो सारख्या उपनगरीय लोकल ट्रेन


भारत नगर रोड (विद्यापीठ परिसर) ते वाकोला जंक्शन या सांताक्रुज - चेंबूर जोडमार्ग टप्पा दोन उन्नत मार्गिकेचे लोकार्पण


चेंबूर मेट्रो स्थानकाचे लोकार्पण 


ठाणे ते बोरिवली दुहेरी मार्गाच्या प्रकल्पातील 'टीबीएम अर्जुना'चा शुभारंभ 


माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले उड्डाणपूल नामकरण





मुंबई :  केंद्र शासनाने उपनगरीय लोकलची मेट्रोच्या धर्तीवर निर्मिती करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे वंदे भारतसारखी आधुनिक रेल्वे बनवित असलेल्या कारखान्यात स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित, स्वच्छ अशा मेट्रो सारख्या लोकल ट्रेनची निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.



मुंबई महानगराच्या दळणवळणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असून लोकार्पण होणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे मुंबईतील दळणवळणाला 'गतिमानतेचा बूस्टर' मिळाला असल्याचा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

सह्याद्री अतिथी गृह येथे दूरदृष्य प्रणाली द्वारे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दोन पायाभूत सुविधांचे ई-लोकार्पण, ठाणे ते बोरिवली दुहेरी भुयारी मार्गाच्या प्रकल्पातील ठाणे बाजूकडील टीबीएम अर्जुनाचा शुभारंभ आणि वांद्रे कुर्ला संकुलाच्या जी ब्लॉकला पूर्व द्रुतगती मार्गासोबत जोडणाऱ्या उड्डाणपूलाला माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले उड्डाणपूल नामकरण कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.


कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, राजहंस सिंह, अबू आजमी उपस्थित होते.

 

२०२७ मध्ये मेट्रोसारख्या २३८ उपनगरीय लोकल ट्रेन मुंबईकरांच्या सेवेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई महानगरमध्ये एकीकडे स्वच्छ सुंदर व वातानुकूलित मेट्रोचा प्रवास आहे तर दुसरीकडे कष्टप्रद वाटत असणारा लोकलचा प्रवास आहे. यामधील तफावत लवकरच दूर होणार आहे. मुंबईकरांच्या सेवेत मेट्रोसारख्या २३८ उपनगरीय लोकल ट्रेन २०२७ मध्ये येणार असून मार्च २०३० पर्यंत संपूर्ण लोकल ट्रेन मेट्रोसारख्या होतील.





 

 

वांद्रे- कुर्ला संकुल परिसरातील वाहतूक कोंडीवर विविध उपाययोजना

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वांद्रे - कुर्ला संकुल परिसरातील वाहतूक कोंडी कायमची संपविण्यासाठी २०१७-१८ मध्ये सहा जोडमार्ग निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार काम सुरू होऊन सहा जोड मार्गांचे आठ झाले. आज शेवटच्या जोड मार्गाचे लोकार्पण करण्यात येत आहे. यामुळे पूर्व आणि पश्चिम मुंबईचे दळणवळण गतिमान होत आहे. भारत नगर रोड ते वाकोला जंक्शन ही उन्नत मार्गिका सुखद प्रवासाचा अनुभव देणारी ठरणार आहे. या जोड मार्गांच्या उतरणीच्या जवळ वाहतूक कोंडी होत असून ही सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अंडरपास किंवा अन्य उपाययोजनांची परिस्थितीनुरूप अंमलबजावणी करावी.

 

चेंबूर मेट्रो स्थानकामुळे मुंबईकरांना  मोठी जोडणी

चेंबूर मेट्रो स्थानकामुळे मुंबईकरांना एक मोठी व चांगली दळणवळणाची जोडणी मिळणार आहे. मुंबई महानगरात मेट्रो मार्गिका विकसित करण्याचे काम वेगाने सुरू असून यावर्षी ६० ते ७० किलोमीटर मार्गे ह्या सेवेत येतील. मुंबई महानगरात ९० लाख प्रवासी उपनगरीय लोकलच्या माध्यमातून प्रवास करतात आणि जवळपास ७० लाख प्रवाशांची क्षमता आपण मेट्रोच्या माध्यमातून विकसित करीत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.




 

देशातील सर्वात लांब दुहेरी भुयारी बोगदा

ठाणे ते बोरिवली या दुहेरी भुयारी मार्गाच्या रूपामध्ये पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशात पुन्हा एक नवीन रेकॉर्ड महाराष्ट्र बनवित आहे. देशातील सर्वात लांब आणि जमिनीखाली असणारा बोगदा राहणार आहे.  ठाणे ते बोरिवली या २३ किलोमीटर लांब मार्गाची लांबी दुहेरी भुयारी मार्गामुळे ११ किलोमीटरवर येणार आहे. यामुळे प्रवासाच्या वेळेत बचत होणार असून अवघ्या १२ ते १५ मिनिटांमध्ये ठाणे ते बोरिवली गाठता येणार आहे. या भुयारी मार्गामध्ये पहिल्या बोगद्यासाठी नायक टीबीएम यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आला आहे, तर दुसऱ्या बोगद्यासाठी अर्जुना टीबीएम आज कार्यान्वित होत आहे. यामुळे दोन्ही दुहेरी भुयारी मार्गाचे काम समांतर पद्धतीने सुरू राहील. बोरिवली बाजूकडील दुहेरी बोगद्यामध्येदेखील लवकरच दोन टीबीएम कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

 

वांद्रे- कुर्ला संकुलाच्या जी ब्लॉकला पूर्व द्रुतगती मार्गासोबत जोडणाऱ्या उड्डाणपुलाला ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले नाव देणे ही बॅरिस्टर भोसले यांच्या कार्याची पावती आहे. त्यांच्या कार्य काळामध्ये स्वातंत्र्यसैनिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती, मुलींकरिता दहावीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय, संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे उद्घाटन त्यांच्या काळात झाले. प्रत्येक विषयाची उत्तम जाण असलेला नेता म्हणून बॅरिस्टर भोसले यांच्याकडे पाहिले जाते. मुंबई शहराच्या जडणघडणीमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अत्यंत मोलाची भूमिका बजावली असल्याचे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ संजय मुखर्जी यांनी केले. तर आभार अतिरिक्त महानगर आयुक्त पी वेलारासू यांनी मानले. कार्यक्रमाला एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

थोडक्यात चेंबूर मेट्रो स्टेशन

मेट्रो मार्ग २ब (डीएननगर ते मंडाले) च्या टप्पा १अ मधील हे एक महत्वाचे स्थानक आहे. चेंबूर उपनगरीय रेल्वे स्थानक आणि मोनोरेल स्थानकाशी जोडणी उपलब्ध असल्याने भविष्यातील बहुविध वाहतूक केंद्र बनणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्ग, सायन-पनवेल महामार्ग, ईस्टर्न फ्रीवे आणि सांताक्रूझ-चेम्बूर लिंक रोड यांच्या जवळ आहे. प्लॅटफॉर्मची लांबी १८५ मीटर (८ डब्यांच्या मेट्रो गाड्यांसाठी अनुकूल) असून लिफ्ट, सरकते जिने, सीसीटीव्ही, दिव्यांगांसाठी सुविधा आणि प्रथमोपचार कक्ष. स्थानकाची रचना 'ग्रीन बिल्डिंग' संकल्पनेनुसार करण्यात आली आहे. मेट्रो स्थानकाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांशी जोडणी असणार आहे. यामध्ये उपनगरीय रेल्वे स्थानक, मोनोरेल स्थानक व मोनोरेलद्वारे महालक्ष्मी स्टेशनशी जोडणीचा समावेश आहे.

 

थोडक्यात सांताक्रुज - चेंबूर जोड मार्ग टप्पा २

 पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यान अखंड पूर्व-पश्चिम वाहतूक मार्ग प्रस्थापित करण्यासाठी सांताक्रूझ-चेम्बूर जोडरस्ता व त्याच्या विस्तार प्रकल्पांचा विकास करण्यात आला आहे. सांताक्रूझ-चेम्बूर लिंक रोड टप्पा २ अंतर्गत भारत नगर रोड (मुंबई विद्यापीठ परिसर) ते वाकोला जंक्शन दरम्यानचा १.४० किमी लांबीचा उन्नत मार्ग हा या जोड मार्गामधील शेवटचा व अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे.

 

या मार्गामुळे बीकेसी आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग यांच्यात थेट व अखंड संपर्क निर्माण होईल. यात १७.२ मीटर आणि ८.५ मीटर रुंदीच्या मार्गिका आहेत.

 

कलिना, वाकोला आणि कलानगर येथील वाहतूक कोंडी टळेल व प्रवासाचा वेळ सुमारे ३५ मिनिटांनी कमी होईल. सांताक्रूझ - चेंबूर जोडणी पूर्ण झाल्यामुळे या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर सिग्नलमुक्त पूर्व-पश्चिम जोडणी उपलब्ध होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.