Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणीचा ध्यास, आरोग्याचा विकास! 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियानातून ५ कोटींचे पारितोषिक जिंकण्याचा दृढ संकल्प

ग्रामपंचायत पदाधिकारी, समिती सदस्य व आरोग्य विभागाच्या बैठकीत चर्चा 


तेरणी : बैठकीत माहिती देताना आरोग्य सेविका सौ. जयश्री कांबळे. यावेळी पं. स. सदस्य स्वप्नील इंगवले, सरपंच रमेश पुजेरी, माजी सरपंच व विद्यमान सदस्य करवीर उथळे, रमजान अंकली, पत्रकार संतोष नाईक व इतर. 


गडहिंग्लज (प्रतिनिधी): गावातील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणे आणि नागरिकांचे आरोग्य अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने तेरणी (ता. गडहिंग्लज) येथे 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियाना अंतर्गत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र शासनाचा एकूण ५ कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर पुरस्कार प्राप्त करण्याचा एकमुखी संकल्प या बैठकीत करण्यात आला.



महाराष्ट्र शासनाच्या 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियाना अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी एकूण ५ कोटी रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर पुरस्कार दिले जातात. गावातील स्वच्छता, आरोग्य सुविधा, माता व बाल आरोग्य आणि आजार नियंत्रण यांसारख्या जवळपास ५९ निकषांवर ग्रामपंचायतींचे गुणांकन केले जाते. मानांकन तपासणीत ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या गावांना 'आरोग्यसंपन्न गाव' म्हणून घोषित केले जाते. सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी ५ कोटी रुपयांपर्यंतच्या पुरस्कारांची तरतूद आहे.



स्वच्छता व आरोग्य व्यवस्थापनावर सविस्तर चर्चा


बैठकीदरम्यान गावातील कचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणे, साथीच्या रोगांचा प्रतिबंध तसेच गरोदर माता व लहान मुलांच्या आरोग्याची काळजी यांसारख्या संवेदनशील विषयांवर सविस्तर चर्चा झाली. गावातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि गाव पूर्णपणे आजारमुक्त व आरोग्यसंपन्न व्हावे, यावर विशेष भर देण्यात आला. विविध प्रभागांमध्ये नियमित स्वच्छता राखणे व कचरा व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आले.



शासकीय योजनांची माहिती व जनजागृती


आरोग्य सेविका जयश्री कांबळे, आरोग्य सेवक बसवराज अगसगी आणि श्री. कुंभार यांनी ग्रामस्थांना विविध शासकीय आरोग्य योजनांची सविस्तर माहिती दिली आणि सर्वांनी नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.


या बैठकीला पंचायत समिती सदस्य स्वप्नील इंगवले, सरपंच रमेश पुजारी, माजी सरपंच व विद्यमान सदस्य करवीर उथळे, ग्रा. प. सदस्य सौ. दीपा नरेवाडी, सौ. सोनव्वा कातीगार, रमजान अंकली, पत्रकार संतोष नाईक, सौ. गीता गोरे, आरोग्य सेवक बसवराज अगसगी, आरोग्य सेविका सौ. जयश्री कांबळे, श्री. कुंभार यांच्यासह अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बैठकीच्या शेवटी गावाला 'आरोग्य संपन्न गाव' बनवून तेरणीचे नाव राज्य पातळीवर झळकवण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन सक्रिय सहभाग नोंदवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.