गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील औरनाळ गावचे प्रतिष्ठित नागरिक सद्गुरु दूध डेअरीचे संचालक, सद्गुरु फाउंडेशनचे सर्वेसर्वा, अष्टपैलू क्रिकेटपटू संजय अजगर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाल्याने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मनाने श्रीमंत, स्वभावाने दिलदार आणि माणुसकीने ओथंबलेला हा माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला. पण त्यांनी जपलेली माणसं आणि दिलेलं प्रेम कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही. क्रिकेटच्या मैदानावर वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्याना नामोहरण करणारे संजय, मैदानाबाहेर मात्र प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणारा माणुसकीचा खेळाडू होता. अनेक वर्ष औरनाळ क्रिकेट संघाचे नेतृत्व करत आपल्या खेळाने गावाचे नाव उंचावले.
समाजकारण,राजकारण, शेती, सामाजिक व धार्मिक उपक्रम असो....संजूचा सहभाग म्हणजे त्या उपक्रमाला आपलेपणाची उब असायची. कुटुंब, पै- पाहुणे आणि मित्रांचा गोतावळा जपत दरवर्षी सर्वांना सहलीला घेऊन जाणारा हा दिलदार माणूस आज स्वतः मात्र एका अशा प्रवासाला निघून गेला आहे, जिथून तो पुन्हा कधीच परतणार नाही.
घराचा आधारवड गेला, मित्रांचा जिवलग सोबती गेला, गावाचा निस्वार्थी कार्यकर्ता गेला आणि असंख्य हृदयांचा "आपला माणूस" गेला. आज त्यांच्या जाण्याने डोळ्यात अश्रू आहेत, मनात असंख्य आठवणी आहेत आणि ओठावर एकच प्रश्न आहे--"संजू, एवढ्या लवकर का निघून गेलास?" अशी शोक भावना सर्वांनी व्यक्त केली.

