भारताला आशिया चषक : सानिका माने अंतिम सामन्यात ठरली ‘सामनावीर’!
नूलच्या मैदानावर सायकलवरून सुरू झालेला प्रवास ठरला सुवर्णमयी
गडहिंग्लज (संतोष नाईक): परिस्थितीच्या काटेरी वाटेवर जिद्दीचे पाय रोवून धावणाऱ्या एका ग्रामीण कन्येने संपूर्ण देशाला अभिमानाचा क्षण मिळवून दिला आहे. एएचएफ महिला ज्युनिअर आशिया कप हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गडहिंग्लज तालुक्यातील मुगळीची सुकन्या सानिका चंद्रकांत माने हिने डागलेला एकमेव पण अतिशय निर्णायक गोल भारताला विजेतेपद मिळवून देणारा ठरला. मैदानावर सानिकाने गाजवलेल्या पराक्रमामुळे भारताने चषकावर नाव कोरले, तर संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंच झाली.
मुगळी ते आशिया चषक: सायकलचा प्रवास ठरला सुवर्णमयी
सानिकाचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. घरची परिस्थिती अत्यंत बिकट; वडील चंद्रकांत माने अल्पभूधारक शेतकरी असून कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी ते टेम्पो चालवून मालवाहतूक करतात, तर आई ज्योती कर्नाटकातील एका शाळेत शिक्षिका आहेत. मात्र, बिकट परिस्थिती कधीच सानिकाच्या स्वप्नांच्या आड आली नाही. गावातील मुगळीहून 'हॉकीची पंढरी' समजल्या जाणाऱ्या नूलच्या मैदानावर सरावासाठी ती दररोज सायकलने जायची. घामाच्या प्रत्येक थेंबाने तिने आपली स्टिक तासनतास घासली.
पहिल्याच आंतरराष्ट्रीय संधीचे सोने!
सानिकाने यापूर्वी तीन वेळा महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषवले असून १० वेळा राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI), NCOE मुंबई येथून तिची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. जुलै महिन्यात इंग्लंडमधील आंतरराष्ट्रीय मालिकेनंतर तिची भारतीय ज्युनिअर संघात निवड झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करणारी ती कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
मैदानावर ठरली 'सामनावीर'
अंतिम सामन्यात जेव्हा दोन्ही संघ विजयासाठी झुंजत होते तेव्हा सानिकाच्या चाणाक्ष खेळाने आणि अचूक गोलने सामन्याचे चित्र बदलले. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिला अंतिम सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बहिण देखील राष्ट्रीय हॉकीपटू
खास बाब म्हणजे सानिकाची मोठी बहीण कृष्णा हीदेखील राष्ट्रीय हॉकीपटू असून नुकतीच तिची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. एका साध्या टेम्पोचालकाच्या घरातून दोन मुलींनी क्रीडा क्षेत्रात घेतलेली ही उत्तुंग भरारी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. मुगळीसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात सध्या सानिकाच्या या सुवर्ण कामगिरीचा जल्लोष सुरू आहे.

