गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज ते संकेश्वर रस्त्यावर सोमवारी (दि. २१) सायंकाळी एका ५८ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून दोन अनोळखी चोरट्यांनी पोबारा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऐन वर्दळीच्या रस्त्यावर सायंकाळी सात-पावणेआठच्या सुमारास हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, सुलोचना मधुकर पोवार (वय ५८, रा. अंकली संकेश्वर, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) या सोमवारी सायंकाळी गडहिंग्लज येथील मेडिकलमधून औषधे घेऊन हॉस्पिटलकडे पायी चालत जात होत्या. सायंकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास त्या गडहिंग्लज ते संकेश्वर रोडवरील ‘भवानी स्टील’ दुकानासमोर पोहोचल्या असता, पाठीमागून आलेल्या दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी त्यांना लक्ष्य केले.
काही समजण्याच्या आत चोरट्यांनी सुलोचना यांच्या गळ्यातील सोन्याची मोहनमाळ जबरदस्तीने खेचली आणि त्यातील अंदाजे ४०,००० रुपये किमतीचे ४ ग्रॅम वजनाचे ३८ सोन्याचे जुने वापरते मणी हिसकावून दुचाकीवरून पसार झाले.
याप्रकरणी सुलोचना पोवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलीस ठाण्यात अनोळखी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील महिला वर्ग आणि नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. पोलीस उपनिरीक्षक केरुरकर हे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली जात आहे.

