गडहिंग्लज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा - बाळेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): चालू वर्षात पावसाने दिलेल्या ओढीमुळे गडहिंग्लज तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेजारील आजरा व चंदगड तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाला असताना, गडहिंग्लज तालुक्याला मात्र शासनाने वगळल्याने तालुक्यातील बळीराजा आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कृषी विभागाच्या चुकीच्या अहवालामुळे गडहिंग्लजवर अन्याय झाल्याचा आरोप करत, गडहिंग्लज तालुका तत्काळ दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीचे निवेदन विविध पक्ष, सामाजिक संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीने गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना देण्यात आले. हे निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे सादर करण्यात आले आहे. सदर निवेदन माजी पंचायत समिती सदस्य बाळेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
हाता तोंडाशी आलेला घास हिरावला; पिके करपली
निवेदनात नमूद केले आहे की, चालू हंगामात पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने तालुक्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. विहिरी, तलाव आणि बंधारे यांसारख्या प्रमुख जलस्त्रोतांमधील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून भातपीक पूर्णपणे करपून गेले आहे. सोयाबीनचे पिकाचे मोठे नुकसान झाले असून ऊस पिकाची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी केवळ निसर्गाच्या पावसावर अवलंबून असल्याने यंदाच्या हंगामात त्यांना प्रचंड मोठा आर्थिक फटका बसला आहे.
शेजारील तालुक्यांना मदत, मग गडहिंग्लजवरच अन्याय का?
शासनाने राज्यातील ७५ टक्क्यांपेक्षा जास्त तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला आहे. गडहिंग्लजच्या शेजारी असलेल्या आजरा आणि चंदगड तालुक्यांमध्ये तुलनेने बऱ्यापैकी पाऊस झाला असतानाही त्यांचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत करण्यात आला. मात्र, गंभीर परिस्थिती असूनही गडहिंग्लज तालुक्याचा विचार करण्यात आला नाही. कृषी विभागाने शासनाला दिलेल्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या अहवालामुळेच हा अन्याय झाल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. शासनाच्या या पक्षपाती भूमिकेमुळे शेतकरी हतबल झाले असून प्रशासनाविरोधात मोठा रोष निर्माण झाला आहे. हा रोष वेळेत न शांत झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. दरम्यान, पंचायत समिती प्रशासन देखील सदर निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील करपलेल्या व वाया गेलेल्या पिकांच्या स्थितीचे आणि नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत, गडहिंग्लज तालुक्यातील सर्वच गावांमध्ये दुष्काळी परिस्थितीचा तातडीने सविस्तर सर्व्हे करण्यात यावा, तालुक्यातील भूजल पातळीची गतीने तपासणी करून त्याचा अचूक अहवाल तयार करावा, शासनस्तरावरून दुष्काळग्रस्त भागासाठी जाहीर होणारी सर्व प्रकारची आर्थिक व प्रशासकीय मदत गडहिंग्लज तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तत्काळ वितरीत करावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
निवेदनावर माजी पंचायत समिती सदस्य बाळेश नाईक, माजी नगरसेवक उदय कदम, ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता मगदूम, ग्रामपंचायत सदस्य तानाजी कुराडे, रावसाहेब पाटील, प्रकाश कांबळे, अण्णाप्पा शिंदे, संभाजी चौगुले, आनंद कोळी, मारुती कोळी, दशरथ मांगले, शिवानंद घस्ती, विनायक नाईक, आनंदा ऐवाळे, संतोष कुराडे, गजानन कुराडे, रामा जरळी, बाबासाहेब माने, लिंगराज पाटील, शब्बीर साबखान, प्रकाश हरगापुरे यांच्यासह इतर शेतकरी बांधवांच्या सह्या आहेत.


