राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली कोगनोळी, हत्तरगी टोल नाक्यांवर शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन!
कागल, निपाणी भागातून आंदोलकांसाठी भाकरी संकलन सुरू; टोल नाक्यांना छावणीचे स्वरूप
कोल्हापूर : साखरेचा किमान हमीभाव आणि इथेनॉल दराबाबत नवी दिल्लीत केंद्र सरकारसोबत झालेली महत्त्वाची बैठक निष्फळ ठरल्यामुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी ११ वाजल्यापासून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हजारो शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवरील कोगनोळी टोल नाका आणि कर्नाटक येथील हत्तरकी टोल नाका येथे हजारो शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मांडल्याने हा प्रमुख महामार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. या अचानक झालेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांचे पोलीस प्रशासन कमालीचे धास्तावले आहे.
काल नवी दिल्ली येथे केंद्र सरकारचे प्रतिनिधी आणि शेतकरी नेत्यांमध्ये साखर आणि इथेनॉलच्या दराबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रमुख तीन मागण्यांवर चर्चा झाली. यामध्ये साखरेचा किमान हमीभाव (MSP) प्रतिकिलो ५० रुपये करावा, सी-हेव्ही इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करावा ,केंद्र सरकारच्या निर्देशानुसार साखर हंगाम लवकर सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्यावे. अशी मागणी करण्यात आली. मात्र, केंद्र सरकारकडून या मागण्यांवर कोणताही सकारात्मक निर्णय न झाल्याने ही बैठक पूर्णपणे निष्फळ ठरली. याच्या निषेधार्थ राजू शेट्टी यांनी आज थेट दोन्ही राज्यांच्या सीमांवर आरपारच्या लढाईची घोषणा केली.
आंदोलनाची माहिती मिळताच दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी कोगनोळी टोल नाक्यांकडे धाव घेतली. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने पोलिसांनी तात्काळ वाहतूक रोखून ती अंतर्गत ग्रामीण व पर्यायी मार्गांनी वळवण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून पुणे-बेंगलोर महामार्ग सध्या बंद ठेवण्यात आला असून प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
"जोपर्यंत केंद्र सरकार मागण्यांचा लेखी निर्णय जाहीर करत नाही, तोपर्यंत महामार्ग एक इंचही मोकळा केला जाणार नाही," असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणीच मुक्काम ठोकण्याची तयारी केली आहे. कागल आणि निपाणी तालुक्यातील गावांमधून शेतकऱ्यांसाठी भाकरी आणि पिठलं गोळा केले जात असून, टोल नाक्यावरच सामूहिक जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. आंदोलनाला आता एका मोठ्या छावणीचे स्वरूप आले आहे.
केंद्र सरकारने यावर तातडीने तोडगा न काढल्यास हे आंदोलन अधिक उग्र रूप धारण करेल आणि याचे थेट राजकीय व आर्थिक फटके केंद्र आणि राज्य सरकार या दोघांनाही सहन करावे लागतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.



