Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास आजन्म कारावास

गडहिंग्लज सत्र न्यायालयाचा निकाल; आरोपीला २० हजारांचा दंडही ठोठावला


सरकारी वकील ॲड. सुनील तेली यांचा  प्रभावी आणि मजबूत युक्तिवाद




गडहिंग्लज (प्रतिनिधी): भाड्याची खोली दाखवण्याच्या बहाण्याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला गडहिंग्लज सत्र न्यायालयाने आजन्म कारावास  आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आणखी एक महिना साध्या कैदेची तरतूद निकालात करण्यात आली आहे. रामदास निवृत्ती जावीर (वय ४७, रा. दौलतवाडी, ता. कागल) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश  अमित लऊळकर यांनी हा निकाल दिला. या खटल्यात सरकारी वकील सुनील तेली यांनी न्यायालयात मांडलेला प्रभावी आणि मजबूत युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधीशांनी आरोपीला वरील शिक्षा सुनावली.


नेमकी घटना काय?


मूळची कर्नाटकातील असलेली १७ वर्षीय पीडित मुलगी आपल्या आई-वडील आणि आजीसोबत गडहिंग्लज येथे भाड्याच्या घरात राहत होती. तिचे आई-वडील मोलमजुरी करून संसार चालवतात. ऑगस्ट २०२४ मध्ये पीडितेच्या आईच्या मैत्रिणीला भाड्याने रूम हवी होती. आरोपी रामदास हा ओळखीचा असल्याने, त्याच्यासोबत ती खोली शोधण्यासाठी गेली होती. याचाच गैरफायदा घेत रामदासने स्वतःच्या चाळीतील एक खोली दाखवण्याच्या बहाण्याने तिला आत नेले अन् तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. "याबाबत कोणाला काही सांगितले किंवा वाच्यता केली तर तुझ्या आई-वडिलांना अन् तुला जिवाने मारून टाकेन," अशी धमकी देऊन त्याने तिला शांत ठेवले होते.


काही दिवसांनंतर पीडित मुलीच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी वैद्यकीय तपासणीस नेले असता ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. या धक्कादायक प्रकारानंतर पीडितेने हिंमत दाखवून पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपी रामदास जावीर याला गजाआड केले.


न्यायालयात ९ साक्षीदारांची साक्ष ठरली महत्त्वाची


या घटनेचा सखोल तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्यादरम्यान एकूण ९ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली.


सरकारी वकील ॲड.सुनील तेली यांचा  प्रभावी आणि मजबूत युक्तिवाद


सरकारी वकील सुनील तेली यांनी न्यायालयात मांडलेला प्रभावी आणि मजबूत युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधीशांनी आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार विजय बंदी यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.