ठाकरे शिवसेनेचे मुख्य वनसंरक्षकांना निवेदन ; शेतकऱ्यांच्या समस्येकडे वेधले लक्ष
कोल्हापूर : गेल्या दोन दशकांपासून गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड आणि राधानगरी परिसरातील जंगलात वन्यप्राण्यांनी उच्छाद मांडला असून विशेषतः हत्ती आणि बिबट्यांच्या सततच्या उपद्रवामुळे ग्रामीण भाग आणि बळीराजा तीव्र दहशतीखाली वावरत आहे. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी थेट नागरिक वसाहतींकडे वळल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांचे जगणे मुश्कील झाले असून, या गंभीर प्रश्नी वनविभागाने तातडीने युद्धपातळीवर उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ठाकरे शिवसेनेच्या वतीने उपवनसंरक्षक यांना देण्यात आले आहे. शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड आणि राधानगरी या पट्ट्यातील जंगल परिसरातील वन्यप्राणी आता थेट नागरी वसाहती आणि शेतीशिवारात धडकत आहेत. या वर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पानाच्या आणि पाण्याच्या शोधात रानटी प्राणी मानवी वस्तीकडे येत असून, त्यांचे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
वन्य प्राण्यांच्या या वाढत्या त्रासामुळे शेतात कामाला जाणारे शेतकरी आणि शेतमजूर यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः जंगलालगत असलेल्या वाड्या-वस्त्यांवर हत्ती आणि इतर वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातल्यामुळे नागरिकांमध्ये एकप्रकारची दहशत निर्माण झाली आहे. हत्तीचा प्रश्न तर आता दिवसेंदिवस अत्यंत त्रासदायक ठरत असून गेल्या दोन दशकांत कर्नाटक आणि महाराष्ट्र शासनाने संयुक्त प्रयत्न करूनही वन्यप्राण्यांना हुसकावण्यात म्हणावे तसे यश आलेले नाही.
वृक्षतोड आणि बदलांमुळे वन्यप्राण्यांचा लढा तीव्र
निसर्गातील बदल आणि बेसुमार वृक्षतोडीमुळे जंगलातील पाणीसाठे आटले आहेत. परिणामी हे प्राणी नागरी वसाहतींकडे धाव घेत आहेत. अनेकदा घोषणा आणि बैठका होऊनही प्रत्यक्षात ठोस काहीही हालचाल झालेली दिसत नाही. आंबोली जवळ हत्तीग्राम निर्माण करून या परिसरात दहशत माजवणाऱ्या हत्तींचा बंदोबस्त करण्याचे नियोजन जाहीर झाले होते, मात्र त्या दिशेने गंभीरपणे अंमलबजावणी झालेली नाही.
वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने तातडीने युद्धपातळीवर उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जर या प्रश्नावर तातडीने पावले उचलली गेली नाहीत आणि शेतकरी, ग्रामस्थांची होणारी हेळसांड थांबली नाही तर पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
या शिष्टमंडळात जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, राजु रेडेकर, तालुकाप्रमुख युवराज पवार, कृष्णा डाकरे, गणेश बागडी, रवींद्र पाटील, दीपक तेली यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.



