गडहिंग्लज (प्रतिनिधी): राज्यात दुष्काळाची भीषणता वाढल्याने राज्य सरकारने आणखी ४० तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश केला आहे. यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची एकूण संख्या आता ३०५ वर पोहोचली आहे. मात्र, या नव्या ४० तालुक्यांच्या गडहिंग्लज तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही. आधीच्या २६५ आणि नंतरच्या पडताळणी यादीत देखील नाव नव्हते. आताच्या नव्याने जाहीर केलेल्या ४० तालुक्यांमध्येही नाव न आल्यामुळे गडहिंग्लज तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडले आहेत.
गडहिंग्लज तालुका पुन्हा एकदा उपेक्षित
राज्यात एकूण ३०५ तालुके दुष्काळी म्हणून घोषित करून तिथे विविध सवलती आणि दुष्काळी उपाययोजना लागू केल्या जात आहेत. मात्र, गडहिंग्लज तालुक्याला यातून पुन्हा एकदा वगळण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांवर सतत होणारा निसर्गाचा अन्यायासोबतच प्रशासकीय अन्यायाचीही भर पडली आहे. कर्जवसुलीस स्थगिती आणि शासकीय मदतीपासून गडहिंग्लज तालुक्यातील शेतकरी वंचितच राहणार का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
राज्यात दुष्काळी तालुक्यांची संख्या ३०५ वर पोहोचली असून ट्रिगर लागू करण्याच्या प्रक्रियेला गती दिली जात आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत गडहिंग्लज तालुक्याला पुन्हा एकदा डावलल्यामुळे स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात असून तालुक्याचा तातडीने या यादीत समावेश करण्याची मागणी जोर धरत आहे.

