ग्रामसभा, ग्राहक मेळाव्यांतून संवादाचे पर्व; ग्राहकांच्या विश्वासाने मोहीम यशस्वी
चंदगड उपविभाग कामगिरीत अव्वल; दिवसा वीज वापरावर ग्राहकांना मिळणार आर्थिक सवलत
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) गडहिंग्लज विभागाने डिजिटल वीजसेवेच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. विभागातील सर्व १ लाख ५५ हजार १८९ ग्राहकांकडे १०० टक्के स्मार्ट मीटर बसवण्याचे उद्दिष्ट नुकतेच यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. ग्राहकांनी महावितरणवर दाखवलेला दृढ विश्वास, दिलेले सहकार्य आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण नियोजन यांमुळेच हे यश शक्य झाले असून, या कामगिरीचे संपूर्ण श्रेय महावितरणने आपल्या ग्राहकांना समर्पित केले आहे.
मोहिमेचा प्रवास आणि उपविभागनिहाय कामगिरी
२७ ऑगस्ट २०२४ रोजी गडहिंग्लज येथे पहिल्या स्मार्ट मीटरच्या स्थापनेने या मोहिमेची सुरुवात झाली होती. त्यानंतर आजरा, चंदगड, गडहिंग्लज आणि नेसरी या चारही उपविभागांत टप्प्याटप्प्याने मोहीम राबवून १३ ऑक्टोबर २०२६ रोजी शेवटचा स्मार्ट मीटर बसवत १००% उद्दिष्ट साध्य करण्यात आले. या मोहिमेत चंदगड उपविभागाने ४८,३८६ स्मार्ट मीटर बसवून सर्वाधिक योगदान दिले. चंदगड ४८,३८६, गडहिंग्लज ४२,३४०, आजरा ३७,१६९, नेसरी विभागात २७,२९४ स्मार्ट मीटर बसविण्यात आले.
गैरसमज दूर करत जिंकला ग्राहकांचा विश्वास
स्मार्ट मीटर मोहिमेच्या सुरुवातीला नागरिक व लोकप्रतिनिधींच्या मनात अनेक शंका व गैरसमज होते. हे आव्हान पेलत महावितरणच्या पथकांनी गावागावांत जाऊन थेट संवाद साधला. ग्रामसभा आणि ग्राहक मेळाव्यांच्या माध्यमातून स्मार्ट मीटरची पारदर्शक कार्यपद्धती, अचूक रीडिंग आणि मिळणारे फायदे समजावून सांगितले. महावितरणच्या या सकारात्मक आणि पारदर्शक जनजागृतीमुळे नागरिकांमधील शंका दूर होऊन मोहिमेला अभूतपूर्व पाठबळ मिळाले.
'स्मार्ट ToD' मीटरमुळे दिवसा वीज वापरावर मिळणार आर्थिक सवलत
स्मार्ट टाइम ऑफ डे (ToD) तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना दिवसा (सकाळी ९ ते सायंकाळी ५) वापरलेल्या विजेची स्वतंत्र नोंद मिळणे शक्य झाले आहे. त्यामुळे दिवसा वीज वापरणाऱ्या पात्र ग्राहकांना दररचनेनुसार प्रति युनिट आर्थिक सवलतीचा थेट फायदा घेता येईल:
आर्थिक वर्ष २०२५-२६: ₹०.८० प्रति युनिट सवलत, आर्थिक वर्ष २०२६-२७: ₹०.८५ प्रति युनिट सवलत, आर्थिक वर्ष २०२७-२८: ₹०.९० प्रति युनिट सवलत.
समन्वित प्रयत्नांचे फलित
मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे व कार्यकारी अभियंता संजय कृष्णा पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंते अतुल भरमू पाटील (आजरा), अजित भीमराव पोवार (चंदगड), बिरुदेव मेटकर (नेसरी) व राम रघुनाथ सूर्यवंशी (गडहिंग्लज) तसेच सर्व अभियंते, कर्मचारी आणि AMISP यंत्रणेने या मोहिमेत अहोरात्र श्रम घेतले.
"ग्राहकांचे सहकार्य आणि कर्मचाऱ्यांचे समर्पण यांमुळेच गडहिंग्लज विभाग शंभर टक्के 'स्मार्ट' झाला आहे. या यशाचे खरे मानकरी आमचे वीज ग्राहकच आहेत."
- महावितरण प्रशासन

