गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) राजकारणात गडहिंग्लज तालुक्याने अखेर आपले स्थान पुन्हा निर्माण केले आहे. तब्बल १३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर काँग्रेसचे विद्याधर गुरबे यांच्या विजयामुळे तालुक्याला गोकुळच्या संचालक मंडळात प्रतिनिधित्व मिळाले आहे. मागील निवडणुकीत अवघ्या १३ मतांनी हुकलेला विजय गुरबे यांनी यंदा खेचून आणला. दुसरीकडे, उमेदवारी मिळूनही पक्षांतर्गत समीकरणांमुळे राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांना पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सतेज पाटलांवरील निष्ठा आणि भक्कम संघटन
विद्याधर गुरबे यांची ही उमेदवारी आणि विजय आकस्मिक मानला जात नाही. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आणि गडहिंग्लज उपविभागीय समन्वयक म्हणून काम करत असताना गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांत कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत केले होते. याशिवाय गडहिंग्लज साखर कारखान्यातील संचालक तसेच उपसभापती पदाचा त्यांच्या पाठीशी असणारा अनुभव, आमदार सतेज पाटील यांच्याशी राखलेली निष्ठा यामुळेच त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
हत्तरकींनंतर तालुक्याला मिळाली नवी संधी
गडहिंग्लजचा 'गोकुळ'मधील इतिहास पाहता, १९९० ते २०१३ या काळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. राजकुमार हत्तरकी यांनी सलग २३ वर्षे संचालक आणि दोन वेळा अध्यक्षपद भूषवले होते. मात्र, २०१३ मध्ये त्यांच्या निधनानंतर तालुक्याचे प्रतिनिधित्व पूर्णपणे थांबले होते. मागील निवडणुकीत महाडिक आघाडीकडून सदानंद हत्तरकी व प्रकाश चव्हाण, तर सतेज पाटील-हसन मुश्रीफ आघाडीकडून महाबळेश्वर चौगुले व विद्याधर गुरबे असे चारही उमेदवार पराभूत झाल्याने तालुका प्रतिनिधीविना राहिला होता.
यंदाच्या निवडणुकीत समविचारी आघाडीकडून गुरबे यांच्यासोबत सुभाष डोंगरे आणि राष्ट्रवादीकडून सतीश पाटील रिंगणात होते. त्यात गुरबे यांनी बाजी मारत तालुक्याचा १३ वर्षांचा राजकीय वनवास संपवला.

