सिंबायोसिस स्कूल हरळी बु।। येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न 
हरळी बु।। : सिंबायोसिस स्कूल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना अरुण हरळीकर, डॉ.सतीश घाळी, सचिन शिंदे व इतर मान्यवर.
गडहिंग्लज( प्रतिनिधी): अल्प यशाने हुरळून न जाता आजकालच्या स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल तर सातत्यपूर्ण कष्ट आवश्यक आहेत. शिक्षण घेण्याची प्रचंड इच्छाशक्ती असेल तर मार्ग नक्की सापडतात. अशावेळी परिस्थिती कशीही असो पण एकदा मनाने अथक परिश्रम केले की यश नक्की मिळते असे प्रतिपादन कोजीमाशीचे नूतन संचालक सचिन शिंदे यांनी केले.
ते सिंबायोसिस स्कूल हरळी बु।। येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात बोलत होते. पुढे ते म्हणाले की वैदिक काळातील ब्रम्हचर्यआश्रम ,गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम आजच्या घडीला ही महत्वाचे ठरत असून माणसाने ज्या त्या वयात योग्य कर्म करत राहणे आवश्यक आहे. तेंव्हाच त्या व्यक्तीचे जीवन सार्थकी झाले असे म्हणता येईल. विद्यार्थी जीवनात शिक्षण घेत असताना किंवा यश मिळवताना अनेक अडचणी व अपयश येत असतात पण त्यातून खचून न जाता जिद्दीने कार्यरत राहा असे आवाहन शिंदे यांनी केले. यावेळी आयोजित कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक संभाजी कार्वेकर यांनी केले. त्यानंतर सिंबायोसिस व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. सतीश घाळी यांच्याहस्ते कोजीमाशीच्या नूतन संचालक पदी निवड झाल्याबद्दल सचिन शिंदे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अनुक्रमे सृष्टी कोरे, श्रीधर शेलार,उद्धव गुरव, पायल लोहार,संस्कार भुईम्बर,सत्यजित होडगे या विद्यार्थ्यांचा शालांत परीक्षेत यश मिळवल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ सतीश घाळी यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांनी सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष पद्मभूषण डॉ.शां.ब.मुजुमदार व भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी असे आवाहन केले. वर्गशिक्षक संतोष आंबी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सूत्रसंचालन रावसाहेब मुरगी आणि वहिदा मुल्ला यांनी केले तर आभार अशोक पाटील यांनी मानले. याप्रसंगी अरुण हरळीकर, माजी सरपंच बळवंत गुरव, पोलिस पाटील रेणुका परीट, रामचंद्र होडगे, शिवाजी होडगे, कविता कगीणकर, राजेंद्र शेलार, अतुल अहिरे, अनुपमा देसाई, दिगंबर पाटील, दत्ता गोंधळी, यल्लापा कोळी, इंद्रजित पाटील यांच्यासह पालक विद्यार्थी उपस्थित होते.
