🔘 गडहिंग्लज तालुक्यातील चित्र
🔘 तांबेरा व मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना बसला फटका
🔘शेंगामध्ये दाणे कमी भरले, वाढही खुंटली
🔘 तालुक्यात सोयाबीन काढणी कामाला प्रारंभ
![]() |
| तेरणी: येथे सोयाबीन कापणी कामास प्रारंभ झाला आहे. |
गडहिंग्लज (संतोष नाईक ): गडहिंग्लज तालुक्यात सध्या सोयाबीन पिक काढणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव व दाणे भरणीच्या कालावधीतच पडलेला तुफान पाऊस यामुळे सोयाबीन पिकाला फटका बसला असून उत्पादनात घट झाली आहे. सोयाबीन मळणी नंतर निघालेले उत्पादन पाहता खर्च व उत्पादनाचा मेळ न बसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दरवर्षीपेक्षा यंदा उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी असल्याचे सध्या गडहिंग्लज तालुक्यात दिसत आहे.
![]() |
| तेरणी: येथे सोयाबीनचे असे बारीक दाणे निघाले आहेत. दरवर्षीपेक्षा यंदा उत्पादन कमी झाले आहे. |
नगदी पीक असल्याने तालुक्यातील शेतकरी सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतात. गडहिंग्लज तालुक्यात 12180 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पीक आहे. सोयाबीन वाढीच्या टप्प्यावर असतानाच मध्यंतरी पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे पिकाची वाढ खुंटली. त्यातच तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर काढणीच्या टप्प्यात पिक असतानाच सलग तीन-चार दिवस पावसाने मुसळधारपणे हजेरी लावली.
मुळातच तांबेराचा प्रादुर्भाव व पावसाचा तुफान मारा यामुळे शेतात पाणी थांबले. याचा परिणाम पिकांवर झाला. सोयाबीनच्या शेंगामध्ये दाणे कमी प्रमाणात व बारीक झाले आहेत. यामुळे उत्पादनात घट झाली आहे.
दरवर्षीपेक्षा यंदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पीक कापणी व मळणीचा खर्च पाहता शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडल्याचे चित्र आहे. सध्या तालुक्यात सोयाबीन काढणी कामाला प्रारंभ झाला आहे. त्यातच अधून मधून पावसाचे वातावरण तयार होत असल्याने काढणीला आलेले पीक कापणी वेळेत करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.



