गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील शिवराज महाविद्यालयामध्ये सेवा पंधरवडा निमित्त आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी या अभिनव उपक्रमातून एकाच दिवशी एकूण 21 वर्गामध्ये महात्मा गांधीजींच्या विचारांचा जागर करण्यात आला.
शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था सचिव डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम.कदम यांच्यासह महाविद्यालयाच्या डॉ.आनंदा कुंभार, डॉ. एन. आर.कोल्हापुरे, डॉ. राजेंद्र गुंडे, डॉ. मनमोहन राजे, डॉ. आर.पी.हेंडगे, डॉ. ए. जी. हारदारे, प्रा.आझाद पटेल, डॉ.महेश चौगुले, प्रा.गौरव पाटील, डॉ. बी.एम.जाधव आदींच्या सहभागाने 21 व्याख्यानातून महात्मा गांधीजींच्या विचारांचा जागर करण्यात आला. संपूर्ण जग महात्मा गांधीजी यांच्या विचारांचा पाईक होत आहे. त्यांनी सत्य, अहिंसेच्या मार्गाने दिलेला लढा किती प्रबळ आणि प्रभावी आहे याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
आजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चरित्र वाचले पाहिजे तरच आपल्याला खऱ्या अर्थी महात्मा गांधीजी कळणार आहेत. महात्मा गांधीजी यांच्या विचारांचे पारायण होणे आवश्यक आहे. अन्यायाला विरोध करण्यासाठी शांततेच्या मार्गाने लढा देणारे प्रभावी अस्त्र महात्मा गांधीजींच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दिले आहे. आजच्या तरुण पिढीला महात्मा गांधीजी कळले पाहिजेत यासाठी या अभिनव उपक्रमाचे आयोजन खऱ्या अर्थी सार्थकी लावण्यासाठी महाविद्यालयाने हा अभिनव उपक्रम राबविला आहे, असे संस्था सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी स्पष्ट केले. यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या विचारांची देशाला पुन्हा गरज आहे. यासाठी आजच्या तरुणाईला महात्मा गांधीजी समजले पाहिजेत यासाठी महाविद्यालयाने या अभिनव उपक्रमातून महात्मा गांधीजींच्या विचारांचा जागर महाविद्यालयात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या व्याख्यानातून देशासाठी योगदान देणारे दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जय जवान जय किसान, इंदिरा गांधी यांचे गरीबी हटाव कार्य, राजीव गांधी यांच्या माध्यमातून संगणकीय तंत्रज्ञानातील प्रगती कशाप्रकारे देशात झेपावले आहे यासह देशाचे अन्य पंतप्रधान यांनी केलेल्या मौलिक कार्याचे विवेचनही यावेळी करण्यात आले.
विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर या माध्यमातून केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याची माहिती या व्याख्यानातून देण्यात आली. महाविद्यालयात घेण्यात आलेल्या या व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रसायनशास्त्र विभागाच्या वतीने डॉ. ए. एम. हसुरे व स्टापने या कार्यक्रमाचे संयोजन केले.







