गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, राज्यशास्त्र विभाग व भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय सेवा योजना व एनसीसी विभागाच्या वतीने सकाळी साडेसात वाजता महाविद्यालयाच्या मैदानावर एकता दौड कार्यक्रम पार पडला. तसेच सकाळी नऊ वाजता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांच्या हस्ते तर इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. गौरव पाटील यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या संपूर्ण जीवन कार्याचा आढावा आपल्या प्रमुख भाषणातून विद्यार्थ्यांसमोर मांडला. तसेच इंदिरा गांधी यांच्या जीवन कार्याविषयी डॉ. अनिल कुराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली. तसेच राज्यशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय एकता दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली व भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांचे बालपण ते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंतचा जीवनपट भित्तीपत्रकाच्या माध्यमातून उलगडला. या भितीपत्रक प्रदर्शनाचा फायदा महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व सर्व घटकांना झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. डॉ. एन.आर.कोल्हापुरे व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डी.पी.खेडकर यांनी केले. या कार्यक्रमास नॅक को- ऑर्डिनेटर प्रा. के. जे. अदाटे, ग्रंथपाल संदीप कुराडे, रजिस्ट्रार संतोष शहापूरकर, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.




