Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज साखर कारखान्यासाठी 69.18 टक्के मतदान

मंगळवारी होणार मतमोजणी


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यासाठी आज 69.18 टक्के मतदान झाले. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. मतमोजणी मंगळवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

एकूण 74 मतदान केंद्रांवर मतदान झाले. सकाळी आठ वाजता मतदानास प्रारंभ झाला. सकाळी आठ ते दहा यादरम्यान 15.41 टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात संथ गतीने मतदान होत होते. त्यानंतर दुपारी बारापर्यंत 35.95 टक्के इतके मतदान झाले. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला. दुपारी दोन पर्यंत 53.66 टक्के, दुपारी चार पर्यंत 65.74 टक्के तर शेवटच्या टप्प्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 69.18 टक्के मतदान झाले. 

एकूण 19 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी आज झालेल्या मतदानात एकूण 25 हजार 91 सभासदांपैकी 17360 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. संस्था गटात 240 मतदारांपैकी 237 सभासद मतदारांनी मतदान केले.

गडहिंग्लज शहरामध्ये एम आर हायस्कूलवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. या केंद्रावर दोन्हीही आघाड्यांचे नेतेमंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरासह तालुक्यातील मतदान केंद्रांवर सभासद मतदारांना आणण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ दिसून आली. प्रत्येक मत आपल्याच पारड्यात पडावे यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करत असल्याचे दिसले. दरम्यान, छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एम.आर.हायस्कूल नजीक फटाक्यांची आतषबाजी करत निकालापूर्वीच आनंदोत्सव साजरा केला. त्यामुळे याची चर्चा होताना दिसत होती. 

या निवडणुकीत माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडी व आमदार राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री.काळभैरव शेतकरी, कामगार विकास आघाडी यांच्यात दुरंगी लढत होत आहे. साखर कारखान्यावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आमने सामने रिंगणात उतरल्याने या निवडणुकीत मोठी चुरस आहे.

दोन्हीही आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून सभासद मतदार कोणाला पसंती देणार हे दिनांक ८ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या  निकालातून स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.