Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शेवटच्या बाधित शेतकऱ्याला मोबदला मिळेपर्यंत एकजुटीने लढणार

संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा गडहिंग्लजमधील लढा परिषदेत निर्धार


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
संकेश्वर- आंबोली- बांदा महामार्ग बाधित सर्व शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळेपर्यंत लढा देण्याचा निर्धार गडहिंग्लज येथे आयोजित लढा परिषदेत करण्यात आला.

गडहिंग्लज येथे संकेश्वर - बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांची लढा परिषद पार पडली. यावेळी बाधित शेतकऱ्यांनी एकजुटीने लढण्याचा निर्धार केला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी धरणग्रस्त चळवळीचे राज्य संघटक कॉम्रेड अशोक जाधव तर प्रमुख वक्ते म्हणून भाई दिगंबर कांबळे उपस्थित होते.

 बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे👇 क्लिक करा 

यावेळी मार्गदर्शन करताना भाई दिगंबर कांबळे म्हणाले, बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता महामार्गाचे काम सुरू आहे. त्यांचा कुटील डाव हाणून पाडू. महामार्ग बाधीत शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्यासाठी संघटनेच्या पाठीशी आम्ही आहोत. पुणे - बेंगलोर नवीन ग्रीन फिल्ड हायवेचे काम करताना जे सूत्र वापरले त्याचा अनुभव त्यांनी सांगितला व संघटित लढा दिल्यामुळे बाधितांना कसा मोबदला मिळाला हे त्यांनी सांगितले. यावेळी धरणग्रस्तांनी लढा शेवटपर्यंत कसा दिला याचे उदाहरण दिले. त्याप्रमाणे महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी लढा द्यावा, आम्ही पाठीशी आहोत असे सांगितले.

संजय तर्डेकर यांनी आजपर्यंतच्या धरणग्रस्तांच्या लढ्याचा अनुभव सांगितला व संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. लढल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही त्यामुळे सर्वांनी एकजुटीने लढले पाहिजे असे सांगितले.

प्रास्ताविक शिवाजी इंगळे यांनी केले. यावेळी त्यांनी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे महामार्गामुळे होणारे नुकसान, सरकारी अधिकारी व यंत्रणा शेतकऱ्यांना अंधारात ठेवून महामार्गाचे काम सुरू करत आहे. संघटनेच्या माध्यमातून आता पुढील काळात लढ्याची भुमिका ठरविण्यासाठी परिषद आयोजित केल्याचे सांगितले.

 यावेळी महामार्ग बाधित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कॉमेड शिवाजी गुरव यांनी 11 ठरावांचे  वाचन केले. त्या ठरावांना एकमतांनी हात उंचावून सर्वांनी मान्यता दिली. यामध्ये शेवटच्या बाधित शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत एकजुटीने लढणार , संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या बाधित क्षेत्राला कमीत कमी एकरी दीड कोटी रुपये किंवा बाजारभावाच्या दहा पट मोबदला द्यावा,  महामार्ग बाधित प्रत्येक गावातील बाधित शेतकऱ्यांना संपूर्ण मोबदला मिळत नाही तोपर्यंत बाधित गावाच्या हद्दीत कसलेही महामार्गाचे काम सुरू करू नये , बाधित शेतकऱ्यांच्या फळझाडे विहिरी, बोरवेल, पाईपलाईन,घरे, हॉटेल, दुकान,बांधकाम, पत्रा- शेड, जनावरांचा गोठा या सर्वांचे योग्य मूल्यांकन करून त्याचा चार पट मोबदला द्या यासह एकूण 11 ठराव करण्यात आले.

या परिषदेला जयवंत थोरवतकर, शंकर डोंगरे, विशाल गुरव, रवींद्र जाधव, कल्लाप्पा कांबळे, जयश्री संकपाळ, शारुबाई गवळी, महादेव शिंगे, शिवाजी चव्हाण, यांच्यासह दुंडगे, मडिलगे, खेडे, भादवण, अत्याळ, मुत्नाळ, गवसे, आजरा, धनगरमोळा, गिजवणे, खोराटवाडी, हिरलगे, सुळेरान, मसोली,गडहिंग्लज इत्यादी गावचे महामार्ग बाधित शेतकरी उपस्थित होते. आभार जयवंत थोरवतकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.