कर्नाटकातील कमतनूर गेट येथून दोघांना अटक
गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तुपुरवाडी गावच्या हद्दीत शुक्रवारी चार वर्षाच्या चिमुकल्यासह त्याच्या पित्याची केलेल्या हत्येने गडहिंग्लज तालुका हादरला होता. ह्या मेंढपाळ पिता- पुत्राच्या निर्घृण हत्येमुळे तालुका सुन्न झाला होता. या खुनाचे नेमके मारेकरी कोण? व खून कशामुळे झाला हे रात्री उशिरापर्यंत समजलेले नव्हते. गडहिंग्लजचे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन रात्री उशिरापर्यंत तपासाची चक्रे गतीने फिरविली. धागेदोरे हाती आल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी आज शनिवारी बिराप्पा मारुती शंकरट्टी व त्यांची पत्नी सत्यवा उर्फ दडव्वा बिराप्पा शंकरट्टी (दोघेही राहणार जोडकुरळी, तालुका चिकोडी) यांना अटक केली आहे. याची फिर्याद मयताची पत्नी श्रीदेवी हारके (वय 25) यांनी पोलिसात दिली आहे. मारेकर्यांनी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, केंचाप्पा हारके आणि बिराप्पा हे दोघेही आपल्या मेंढरांचे कळप घेऊन तुपुरवाडी गावच्या हद्दीतील दूंडाप्पा पाटील यांच्या शेतात दाखल झाले होते. काही कारणावरून केंचाप्पा आणि बिराप्पा यांच्यात गुरुवारी रात्री वाद झाला होता. या वादाचा राग बिराप्पा याने मनात धरला होता. दरम्यान, केंचाप्पाची पत्नी श्रीदेवी ही पाणी आणण्यासाठी गेल्याची संधी साधत बिराप्पा याने कुऱ्हाडीने तर बिरापाची पत्नी सत्यवा हिने विळ्याने केंचाप्पावर हल्ला केला. ही झटापट सुरू असताना तेथे असणाऱ्या चार वर्षाचा शंकर हारके हा वडील केंचाप्पा ह्याच्या अंगावर पडला. त्यामुळे ह्या मुलावरही वार झाले. ह्या हल्ल्यात केंचाप्पा याच्या शरीरावर बऱ्याच ठिकाणी जबर वार झाले होते तर चिमुकल्या शंकर याच्या गुप्तांगावर वार झाल्याने दोघेही गतप्राण झाले. ही घटना घडल्यानंतर बिराप्पा आणि सत्यव्वा हे दोघेही तेथून पळ काढले होते. पोलिसांनी गतीने तपास करत या संशयित आरोपींपर्यंत पोचले. सायंकाळी गडहिंग्लज पोलिसांनी कर्नाटकातील कमतनूर गेट (तालुका हुक्केरी) येथून त्यांना अटक केली. हल्ल्यातील हत्यारे पोलिसांनी जप्त केले आहेत.अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके करत आहेत.
