गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग मार्फत भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक डॉ. एन.आर. कोल्हापुरे यांनी केले. यावेळी अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भारतीय राज्यघटना' या विषयावर आपल्या मार्गदर्शनातून भारतीय संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ संविधान आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी साकारलेल्या संविधानाने संपूर्ण भारत एकसंघ ठेवला आहे. या संविधानात असलेल्या उद्देशपत्रिकेतील संदर्भ लक्षात घेणे आवश्यक आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी ते वाचलेच पाहिजे. त्यातून भारतीय संविधानाची व्यापकता स्पष्ट होते असे त्यांनी सांगितले. यावेळी उद्देश पत्रिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
यावेळी 26 /11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी व निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महाविद्यालयातील बीए भाग 2 व अकरावीच्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या भारतीय संविधानाबाबत सविस्तर माहिती देणाऱ्या भित्तिपत्रकाचे उदघाटन प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले.
संस्थेचे सचिव डॉ.अनिल कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, प्रा. विक्रम शिंदे यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. ए.जी.हारदारे यांनी केले.





