किटवाड येथील तरुणांच्या साहसामुळे एका तरुणीला वाचविण्यात यश
चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यातील किटवाड धरणाच्या धबधब्यात बुडून बेळगाव येथील चार तरुणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. किटवाड येथील तरुणांमुळे एका तरुणीला वाचविण्यात यश आले आहे. सदर पर्यटक बेळगाव येथील उज्ज्वलनगर, अनगोळसह विविध गल्लीतील आहेत. या घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे.
आशिया मुजावर (वय १७, रा. उज्ज्वलनगर), कुडशिया हासम पटेल (वय २०), रुक्शार भिस्ती (वय २०, दोघीही रा. अनगोळ) व तस्मिया (वय २०, रा. झटपट काॅलनी) असे या मयत तरुणींची नावे आहेत. किटवाड येथे दोन धरण असून क्रमांक एकवर सदर घटना घडली. शनिवारी सकाळीच बेळगाव येथील अनेक कुटुंबे मिळून असे चाळीस जण धरणाच्या ठिकाणी सहलीसाठी आले होते. यावेळी ही दुर्दैवी घटना घडली.
बेळगाव व चंदगड तालुक्याच्या सीमेवरील बेकिनकेरे (ता. बेळगाव) येथून चार किलोमीटर अंतरावर किटवाड (ता. चंदगड) येथे लघुपाटबंधारे धरण आहे. किटवाड येथे दोन धरण असून क्रमांक एकवर सदर घटना घडली. या ठिकाणी धबधब्याचे पाणी पडून पुढे जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झालेल्या सुमारे १२ फूट खोल खड्ड्यात या तरुणी आंघोळीसाठी पाण्यात उतरल्या होत्या. पहिली तरुणी खड्ड्यात पडल्याने दुसरी तिला वाचवण्यासाठी गेली. त्यानंतर तिसरी वाचवण्यासाठी गेली, त्यानंतर चौथी असे करत पाच तरुणी त्या पाण्याच्या खड्ड्यात पडल्या आणि पाचही बुडाल्या. यामधील चौघींचा मृत्यू झाला तर एका तरुणीची प्रकृती गंभीर होती त्यामुळे तिला उपचारासाठी बेळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
किटवाडच्या तरुणांचे साहस, एका तरुणीला वाचविण्यात यश
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्रसंगावधान राखत तातडीने किटवाड येथील महेश हेब्बाळकर, विजय लाड, आकाश पाटील या तरुणांनी धाव घेऊन पाण्याच्या खड्ड्यातून पाचही तरुणींना बाहेर काढले. मात्र चार तरुणींचा मृत्यू झाला. एका तरुणीला वाचवण्यात या तरुणांना यश आले.


