Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करा : डॉ. डी. आर. मोरे

                                 (छायाचित्र: मज्जिद किल्लेदार) 

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी ही शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांच्या हिताचे कार्य करीत आहे. या आघाडीचे काम हे संस्था केंद्रित आहे. जे काय करायचे आहे ते शिवाजी विद्यापीठासाठी करण्याचा निर्धार विकास आघाडीने जपला आहे. शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचा विजय झालाच आहे आता विजयाला हातभार लावण्यासाठी आणि विद्यापीठाच्या हितासाठी विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करणे गरजेचे आहे. चांगल्या कार्यासाठी सतत कार्यरत राहणाऱ्या शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन शिवाजी विद्यापीठ व महाविद्यालय विकास मंडळाचे माजी संचालक डॉ. डी.आर.मोरे यांनी केले.

गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर सिनेट निवडणुकीमध्ये शिवाजी विद्यापीठ विकासासाठी उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या मेळाव्यामध्ये न्यू कॉलेज कोल्हापूरचे प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील यांनी आपल्या भाषणातून विकास आघाडीच्या माध्यमातून प्राचार्य, संस्था चालक, शिक्षक व शिक्षकेतर या सर्वच घटकांना एकत्रित करून विकास आघाडी सकारात्मक दृष्टी ठेवून सर्वांच्या विकासाचे कार्य करीत आहे. शिक्षकांच्या कोणत्याही प्रश्नाला विकास आघाडीने कधीच विरोध केला नाही, मात्र सर्वच घटकांचे प्रश्न सोडवण्याचे कार्य विकास आघाडी करीत आहे. अशा विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. पाटील यांनी केले.

माजी सिनेटचे सदस्य भैय्या माने यांनी शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीची निर्मिती कशी झाली हे सांगितले. या आघाडीच्या माध्यमातून महाविद्यालयांना भारीव असे निधी देण्याचे कार्य केले आहे. त्याचबरोबर अनेक व्यापक स्वरूपाचे कार्य करीत आहे. शिवाजी विद्यापीठाचा लौकिक वाढविण्यासाठी विकास आघाडी कार्यरत आहे. ही विकास आघाडी सक्षमपणे कार्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन करून शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीच्या कार्याला व वाटचालीला शुभेच्छा दिल्या. या मेळाव्यामध्ये  शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांची गडहिंग्लज साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल भैय्या माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे उमेदवार डॉ. रघुनाथ ढमकले, डॉ.अनिल कुराडे, डॉ.नागनाथ मासाळ, डॉ.सागर व्हनाळकर यांनी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजय करण्याचे आवाहन केले. या मेळाव्यास प्राचार्य डॉ. एस.एम.कदम, डॉ. घाळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील, राजा शिवछत्रपती कॉलेजचे प्राचार्य डॉ. निवास जाधव, हलकर्णी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी.अजळकर, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. डी. एम. पाटील, डॉ. सरोज बिडकर, विष्णू खाडे, डॉ.आनंदा कुंभार, प्रा. किशोर अदाटे यांच्यासह या भागातील विविध महाविद्यालयाचे बहुसंख्य प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अशोक मोरमारे यांनी केले. डॉ.सुधीर मुंज यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.