गडहिंग्लज (प्रतिनिधी): संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक 30 डिसेंबर रोजी भादवण गावच्या प्रवेश कमानी जवळील शृंगार हॉल येथे सकाळी 11 वाजता जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी दिली आहे.
या मेळाव्यात पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक, धरणग्रस्त नेते कॉम्रेड अशोक जाधव, धरणग्रस्तांचे राज्य संघटक कॉम्रेड धनाजी गुरव, धरणग्रस्त नेते कॉम्रेड संजय तर्डेकर, महामार्ग बाधित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव मार्गदर्शन करणार आहेत.
संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या बाधित क्षेत्राला राष्ट्रीय महामार्ग लगतचा दर धरून रेडी रेकनरच्या पाचपट दर देण्यात यावा किंवा बाजारभावाच्या दहापट देण्यात यावा, बाधित शेतकऱ्यांची मोबदला मिळण्याची निवाडा नोटीस वहिवाटीप्रमाणे द्यावे, प्रत्येक गावातील बाधित शेतकऱ्यांना संपूर्ण मोबदला मिळत नाही तोपर्यंत बाधित गावच्या हद्दीत महामार्गाचे कोणतेही काम सुरू करू नये, न्यायालयाच्या आदेशाचा व शासन निर्णयाचा गैर अर्थ काढून शेतकऱ्यांची जमीन बळजबरीने ताब्यात घेण्याचा व रस्ता करण्याचा प्रयत्न चालू आहे सदरचे काम शेतकऱ्यांच्या हद्दीत सुरू आहे ते काम बंद करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या हद्दीत काम चालू राहिल्यास कोणत्याही परिस्थितीत सामूहिक रित्या काम बंद केले जाईल, महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या फळझाडे, विहिरी, बोअरवेल, पाईपलाईन, घरे, हॉटेल, दुकान, बांधकाम, पत्रा शेड, जनावरांचा गोठा असेल व दोन्ही बाजूला शेतकऱ्यांची जमीन थोडी शिल्लक असेल व ती त्यांच्या उपयोगाची असेल तर संपूर्ण जमीन बाधित धरून मोबदला देण्यात यावा, नवीन महामार्ग करत असताना जिथे जिथे जिल्हा मार्ग, राज्य मार्ग क्रॉस होतात तेथे महामार्गावर प्रवेश करण्यासाठी तरतूद करा, या महामार्ग कामामध्ये सुरुवातीपासून स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार देण्यात यावा, शेतकऱ्यांच्या सहमती व हक्कासाठी 2013 च्या भुमिअधिकरण कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, बाधित शेतकऱ्यांच्या फळबागा, घरे, विहिरी, बोअरवेल, पाईपलाईन या सर्वांचा सर्वे पंचनामा करताना त्या गावातील शेतकऱ्यांना अगोदर चार दिवस सूचना देण्यात यावी, हा नियोजित महामार्ग गडहिंग्लज व आजरा शहरातून न नेता बायपास रस्त्याची व्यवस्था करण्यात यावी, भविष्यात या दोन्ही शहरांमध्ये वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी होणार आहे त्यामुळे या समस्येचाही विचार होणे आवश्यक आहे. आदी मागण्या या संघटनेच्या आहेत.
या मेळाव्यास बाधित शेतकऱ्यांसह इतर बाधित घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव, शिवाजी इंगळे, जयवंत थोरवतकर, रवींद्र जाधव, आनंदा येसणे, गणपती येसणे आदींसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

