१९९३-९४ सालच्या माजी विद्यार्थ्यांनी त्याकाळच्या खाऊंचे स्टॉल मांडत आठवणींना दिला उजाळा
माजी विद्यार्थी, शिक्षक यासह विविध मान्यवरांनी दिली स्टॉलला भेट
माजी विद्यार्थ्यांच्या या आगळ्यावेगळ्या संकल्पनेचे सर्वांकडून कौतुक
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील साधना शिक्षण संस्थेच्या हिरक महोत्सवा निमित्त आयोजित कार्यक्रमात सन १९९३- ९४ च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी त्याकाळी मिळणाऱ्या विविध खाऊंचे स्टॉल मांडत जुन्या आठवणींना उजाळा दिला. या स्टॉलमध्ये माजी विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत तसेच लहानपणीचा शाळेतील मित्रांसमवेतचे ग्रुप फोटो डिजिटलच्या माध्यमातून लावण्यात आले होते. या स्टॉलमुळे काहीवेळ हे विद्यार्थी आपल्या जुन्या आठवणीत रमल्याचे चित्र पहावयास मिळाले. या आगळ्यावेगळ्या संकल्पनेचे कौतुक होताना दिसत होते.
गेली साठ वर्षे अविरतपणे साने गुरुजींच्या विचाराने प्रेरित होऊन संस्कारक्षम आणि सुसंस्कारित अनेक पिढ्या घडविण्याचे काम साधना शिक्षण संस्थेने केले आहे. संस्थेला साठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हिरक महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. दरम्यान, या शाळेचे सन १९९३-९४ सालचे इयत्ता दहावीचे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्याकाळी मिळत असलेल्या खाऊंचा स्टॉल या कार्यक्रमात मांडला होता.
या स्टॉलवर श्रीखंड गोळ्या, लेमनच्या गोळ्या, अर्काच्या गोळ्या, चिंच, पारले चॉकलेट, चणे, काबुली, नळ्या, शेंगदाणा चिक्की, काकडी, आवळा, पेरू आदी खाऊंचा समावेश होता. सदर स्टॉलवर सलग दोन दिवस माजी विद्यार्थ्यांनी खाऊ मोफत उपलब्ध करून दिला. या स्टॉलला माजी विद्यार्थ्यांसह अनेकांनी भेट देत खाऊंचा आस्वाद घेतला व माजी विद्यार्थ्यांच्या या संकल्पनेचे तोंडभरूनही कौतुक केले.
या आगळ्यावेगळ्या खाऊच्या स्टॉलचे उदघाटन साधना शिक्षण संस्थेचे सचिव जे.बी. बारदेस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रफिक पटेल, जी.एस. शिंदे, सुरेश कोळकी, सुनील चौगुले, नितीन केसरकर, गजेंद्र बंदी, डॉ.श्रीकांत सुतार, अमित हजारे,आतिश मिनंजीस, रवींद्र गाडे पाटील, वसंत नाईक आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
बातमीचा व्हिडिओ पहा 👇





