Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मडिलगे, दुंडगे हद्दीत महामार्गाचे काम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाल्याने शेतकरी संतप्त


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
संकेश्वर- बांदा महामार्गाचे काम मडिलगे, दुंडगे हद्दीत पोलीस बंदोबस्तात पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने शेतकऱ्यांनी विरोध केला असून संतप्त झाले आहेत. जमिनीच्या मोबदल्या संदर्भात ठोस निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काम न करू देण्याचा पवित्रा घेतला आहे.

संकेश्वर-आंबोली- बांदा महामार्गाच्या कामासाठी मध्यंतरी झाडे हटवून रुंदीकरणाचे काम सुरू होते. मात्र या महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी मोबदल्याच्या मागणीवरून हे काम वारंवार बंद पडले होते. काम सुरू करताना शेतकऱ्यांना विश्वासात न घेता काम सुरू केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा यासाठी कॉम्रेड शिवाजी गुरव यांच्या अध्यक्षतेखाली महामार्ग बाधित शेतकऱ्यांची संघटना स्थापन करण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून गडहिंग्लज व आजरा तालुक्याच्या हद्दीत महामार्गाचे सुरू असलेले काम ठोस निर्णय झाल्याशिवाय करू न देण्याचा निर्णय घेत काम बंद पाडण्यात आले होते. विविध आंदोलनेही करण्यात आली आहेत. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सचिव राजेंद्र गड्यानावर यांनी देखील महामार्ग बाधित शेतकऱ्यांना पाचपट नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय काम सुरू न करण्याचा इशारा दिला होता.

दरम्यान, या संदर्भात गडहिंग्लज नगरपालिकेच्या शाहू सभागृहात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, प्रांत अधिकारी यांच्या उपस्थितीत महामार्ग बाधित शेतकऱ्यांची संयुक्त बैठक देखील झाली होती. या बैठकीत शेतकऱ्यांची मूळ जमीन मोजणी केल्याशिवाय काम सुरू करण्यात येऊ नये तसेच बाधित शेतकऱ्यांना पाचपट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तथापि आज ( सोमवार) पुन्हा आजरा तालुक्यातील मडिलगे व गडहिंग्लज  तालुक्यातील दुंडगे हद्दीत पोलीस बंदोबस्तात महामार्गाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न झाल्याने शेतकरी संतप्त झाले. शेतकऱ्यांची मूळ जमीन मोजणी करावी तसेच मोबदल्याबाबत निर्णय झाल्याशिवाय काम सुरू न करण्याचा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला.

 बातमीचा व्हिडिओ येथे पहा 👇

पोलीस बळाचा वापर करून काम सुरू करण्याचा प्रयत्न : कॉम्रेड शिवाजी गुरव

संकेश्वर- बांदा महामार्गाचे काम पोलीस बाळाचा वापर करून सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा आम्ही निषेध करतो. शेतकऱ्यांच्या मूळ जमिनींची मोजणी न करताच त्यांच्या जमिनीत हे काम सुरू केले जात आहे. हे अन्यायकारक आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सुरू असलेले काम आम्ही हाणून पाडू असा इशारा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी यावेळी दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.