गडहिंग्लजमधील सर्वपक्षीय, संघटनांचा इशारा
सीमाभागातील मराठी भाषिकांना आधार देण्यासाठी गडहिंग्लजला विराट मोर्चा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री वारंवार बेताल वक्तव्य करीत सीमा बांधवांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करत आहेत. सीमा भागातील मराठी भाषिकांवरील अन्याय तात्काळ थांबवावा अन्यथा त्यांच्या रक्षणासाठी प्रसंगी आम्हाला कर्नाटकात जाऊन चोख प्रत्युत्तर द्यावे लागेल असा इशारा गडहिंग्लज येथे आयोजित सर्वपक्षीय, संघटनांच्या विराट मोर्चाद्वारे देण्यात आला.
सीमा बांधवांना पाठिंबा दर्शवण्यासाठी गडहिंग्लज येथे सर्वपक्षीय व संघटनांच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनता दलाचे माजी आमदार ॲड.श्रीपतराव शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, शिवसेनेचे शहराध्यक्ष संतोष चिकोडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, काँग्रेसचे बसवराज आजरी, प्रा. किसनराव कुराडे यांच्यासह परशुराम कांबळे, प्रकाश कांबळे, दिग्विजय कुराडे, डॉ.रियाजभाई शमनजी आदींसह सर्वपक्षीय विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लक्ष्मी चौकातून या मोर्चाला प्रारंभ झाला. "सीमाभाग आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे" अशा घोषणा देत हा मोर्चा प्रांत कार्यालयावर आणण्यात आला. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी बोलताना माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे म्हणाले, सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री चितावणीखोर वक्तव्य करीत आहेत, हे अशोभनीय आहे. सीमा बांधवांच्यावर होत असलेला हा अन्याय पाहता देशात लोकशाही आहे की नाही? असा प्रश्न पडतो. त्यामुळे सीमा बांधवांचा प्रश्न सोडवण्याऐवजी भाजपकडून केवळ कटकारस्थान केला जात असल्याचा आरोप ॲड. शिंदे यांनी यावेळी केला. यावेळी प्रकाश कांबळे, बसवराज आजरी, नागेश चौगुले, अमर चव्हाण, परशुराम कांबळे, दिलीप कांबळे, प्रा. किसनराव कुराडे, विजय देवणे आदींची भाषणे झाली. यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना सर्व पक्षांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र- कर्नाटक राज्यात अनेक वर्षापासून सीमावाद प्रलंबित आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असतानाही कर्नाटकचे मुख्यमंत्री आगामी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे प्रकरण नव्याने उकरून काढत आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना देखील सीमा भागातील लोकांना विविध आमिषे दाखविली जात आहेत. जत सारख्या भागात उद्दामपणे पाणीपुरवठा करणे म्हणजे महाराष्ट्रातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील जनता संयम राखून सनदशीर मार्गाने याविरुद्ध लढा देत आहे. सीमाप्रश्नासाठी अनेक मराठी बांधव शहीद झाले आहेत.
वास्तविक पाहता मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीने घटनात्मक मार्गाचा अवलंब करून कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे असते, मात्र याबाबत कर्नाटकची भूमिका ही नेहमी ताठरच राहिलेली आहे. सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बेताल आणि चितावणीखोर वक्तव्य करीत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील वाहनांचे कर्नाटकात तोडफोड करणे, मराठी भाषिक लोकांना मारहाण करणे असे अमानवी प्रकार सुरूच आहेत. कर्नाटकच्या या कृतीमुळे सीमा भागातील मराठी भाषिक जनता भयभीत झाली आहे. गडहिंग्लज तालुक्यातील आम्ही सर्वपक्षीय सीमा भागातील मराठी भाषकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्वेकडील गावातील लोकांना विविध कामांसाठी कर्नाटकात जावे लागते. मात्र सध्या कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे सीमाप्रश्न चिघळला आहे, परिणामी महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या या भागातील जनतेच्या जीविताचा आणि मालमत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्नाटकात सीमा भागातील मराठी भाषिकांवर होत असलेला अन्याय तात्काळ थांबला नाही तर प्रसंगी आम्ही सर्वजण मराठी भाषकांच्या रक्षणासाठी कर्नाटकात जाऊन प्रत्युत्तर देऊ, होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी ही कर्नाटक सरकारची असेल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. या मोर्चात सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




