प्रादेशिक सहसंचालक अशोकराव गाडे यांची सूचना
गडहिंग्लज कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसप्रश्नी संयुक्त बैठक संपन्न
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व उसाची वेळेत उचल होण्यासाठी तोड झालेले क्षेत्र व संभाव्य क्षेत्र याची गावनिहाय यादी गडहिंग्लज कारखान्याने तयार करावी. ती यादी उपविभागात सुरू असलेल्या कारखान्यांना देण्यात यावी. इतर कारखान्यांनीही कर्नाटकातून ऊस आणताना गडहिंग्लज कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्यावे व येथील उसाला प्राधान्य द्यावे अशी सूचना प्रादेशिक सहसंचालक (साखर) अशोकराव गाडे यांनी दिली.
गडहिंग्लज साखर कारखाना काही तांत्रिक कारणामुळे अद्याप सुरू झालेला नसल्याने ऊस उचलीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सचिव राजेंद्र गड्यानावर यांनी निवेदनाद्वारे याकडे लक्ष वेधत बैठक घेण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या शाहू सभागृहात प्रादेशिक सहसंचालक अशोकराव गाडे, उपसंचालक एस.एन.जाधव यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या.
यावेळी बोलताना प्रादेशिक सहसंचालक अशोकराव गाडे म्हणाले, गडहिंग्लज साखर कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाची वेळेत उचल होणे गरजेचे आहे. गडहिंग्लज साखर कारखाना काही तांत्रिक कारणांमुळे अजूनही सुरू झालेला नाही त्या पार्श्वभूमीवर आता कार्यक्षेत्रातील शिल्लक उसाची माहिती घेण्यात येत आहे. वेळेत उसाचे गाळप होऊन शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आतापर्यंत गाळपास गेलेला ऊस व संभाव्य ऊस क्षेत्राची गावनिहाय यादी तयार करण्यात यावी. गडहिंग्लज साखर कारखान्याच्या यंत्रणेने कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या ऊस क्षेत्राची माहिती त्या त्या गावात शेतकऱ्यांना भेटून घेण्याची सूचना त्यांनी केली. तसेच ऊसतोड टोळ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ऊसतोड टोळ्यांकडून शेतकऱ्यांची पैशासाठी अडवणूक होत असेल तर त्यांनी या नोडल अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी असे आवाहन करून या तक्रारींची तातडीने दाखल घेतली जाईल असे सांगितले.
गडहिंग्लज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण म्हणाले, इतर कारखान्यांनी कर्नाटकातील ऊस आणण्याऐवजी गडहिंग्लज कारखाना कार्यक्षेत्रातील उसाची उचल प्राधान्याने केल्यास येथील शेतकऱ्यांचा ऊस लवकरात लवकर गाळपास जाण्यास मदत होईल. यासाठी आपण साखर कारखान्या मार्फत सर्व ते सहकार्य करू असे सांगितले. संचालक सतीश पाटील यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस गाळपासाठी वेळेत कसा उचलता येईल याबाबत या बैठकीत नियोजन करण्यात यावे व या विषयावरच चर्चा करून विचारविनिमय करण्यात यावा व सर्व कारखान्यांना ऊस उचल करण्यासंदर्भात कोटा ठरवून देण्यात यावा असे सुचवले.
कमी ऊस क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या उसाची उचल वेळेत केली जात नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला येतो व अखेर ऊसतोड टोळ्यांना पैसे देऊन आपला ऊस वेळेत घालवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना करावा लागतो याकडे शेतकऱ्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या उसाची नोंद घेऊन उचलही वेळेत व्हावी तसेच बसपाळीचा कालावधी कमी करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली.
या बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सचिव राजेंद्र गड्यानावर, गडहिंग्लज साखर कारखान्याचे संचालक सतीश पाटील, दिग्विजय कुराडे, गडहिंग्लज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक औदुंबर तांबे, आजरा साखर कारखान्याचे श्री.भोसले यांच्यासह विविध कारखान्यांचे अधिकारी, शेतकरी उपस्थित होते



