शिवसेना उपशहर प्रमुख गडकरी, कुराडे यांचा इशारा

काशिनाथ गडकरी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरात रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे मुजवावेत अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी, संदीप कुराडे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, गडहिंग्लज शहर हे शिक्षण, वैद्यकीय यासह मिरची व गुळ बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. उपविभागातील गडहिंग्लज शहर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे शहरात सतत गर्दी असते. शहरातील संकेश्वर रोड, काळभैरी रोड, आजरा रोड, भडगाव रोड, बसस्थानक परिसर आदी ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे छोट्या-मोठ्या अपघाताला हे खड्डे निमंत्रण देत आहेत. पालिकेने शहरातील हे खड्डे तातडीने मुजवावेत अन्यथा आंदोलनाचा इशारा या पत्रकातून देण्यात आला आहे.
